Marathi TV Serial : प्रदीप वेलणकर यांची दुसरी लेक दिसणार छोट्या पडद्यावर; चित्रपटाचे केले आहे दिग्दर्शन
Meera Velankar In Zee Marathi New Serial : ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची दुसरी कन्या आणि अभिनेत्री मधुरा वेलणकरची बहिण मीरा वेलणकर ही देखील आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
Meera Velankar : छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका सुरू आहेत. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी टीव्ही वाहिन्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर (Pradeep Velankar) यांची दुसरी कन्या आणि अभिनेत्री मधुरा वेलणकरची (Madhura Velankar) बहिण मीरा वेलणकर (Meera Velankar) ही देखील आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे. मीरा वेलणकरने याआधी काही चित्रपटात काम केले असून ती दिग्दर्शिका आहे. मीरा वेलणकर ही छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
'झी मराठी' वाहिनीवर (Zee Marathi) या आठवड्यापासून, 12 फेब्रुवारीपासून पारू आणि शिवा या दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. त्याशिवाय, ‘जगद्धात्री’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झी मराठीने सुरू होणाऱ्या नव्या मालिकेसाठी सध्या सुरू असलेल्या मालिकेच्या वेळेत बदल केला आहे.
मीरा वेलणकर कोणत्या मालिकेत दिसणार?
मीरा वेलणकर ही झी मराठीवरील 'शिवा' या नव्या मालिकेत झळकणार आहे. 'शिवा' मध्ये मीराची महत्त्वाची भूमिका आहे. मीरा वेलणकर या मालिकेतील मुख्य व्यक्तीरेखा असलेल्या आशूची आई सीताईची व्यक्तिरेखा साकारणार आहे.'शिवा' ही मालिका 12 फेब्रुवारीपासून सोमवारी ते शनिवार रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
View this post on Instagram
कोण आहे मीरा वेलणकर?
प्रदीप वेलणकर यांची मुलगी एवढीच मीरा वेलणकरची ओळख नाही. मीराने अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात मीराने काम केले आहे. मीराने ‘झी मराठी’च्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत चित्रलेखा ही भूमिका साकारली होती. त्याशिवाय, मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या बटरफ्लाय या चित्रपटाचे दिग्दर्शन मीराने केले होते.
'सारं काही तिच्या'साठी मालिकेचे काय होणार?
‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारीत केली जाते. परंतु, 'पारो' या नव्या मालिकेमुळे झी मराठीने 12 फेब्रुवारीपासून या मालिकेची वेळ बदलली आहे. आता खुशबू तावडेची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका सोमवारी ते शनिवार रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.