Marathi Serial Updates Star Pravah : 'ती परत येतेय...'चं गुपित उलगडलं; 'या' अभिनेत्रीचे तब्बल 9 वर्षानंतर स्टार प्रवाहवर कमबॅक
Marathi Serial Updates Star Pravah : मागील काही दिवसांपासून 'स्टार प्रवाह'कडून 'ती परत येतेय...' या टॅगखाली नव्या मालिकेबद्दल आणि अभिनेत्रीबद्दल उत्सुकता वाढवण्यात आली होती. अखेर आज त्यावरून पडदा उघडण्यात आला आहे.
Marathi Serial Updates Star Pravah : छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. टीआरपीच्या शर्यतीच आघाडीवर राहण्यासाठी सगळ्याच वाहिन्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने प्रेक्षकांमध्ये नव्या मालिकांबद्दल उत्सुकता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. मागील काही दिवसांपासून 'स्टार प्रवाह'कडून (Star Pravah) 'ती परत येतेय...' या टॅगखाली नव्या मालिकेबद्दल आणि अभिनेत्रीबद्दल उत्सुकता वाढवण्यात आली होती. अखेर आज त्यावरून पडदा उघडण्यात आला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर तब्बल 9 वर्षानंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) कमबॅक करणार आहे. स्टार प्रवाहची नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत तिची मुख्य भूमिका असणार आहे.
स्टार प्रवाहवरील 'देवयानी' या मालिकेने छोट्या पडद्यावर धुमाकूळ घातला होता. या मालिकेने सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. अभिनेत्री शिवानी सुर्वे ही मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचली होती. आता हीच 'देवयानी' शिवानी सुर्वे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवरील 'नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं' मधून शिवानी तब्बल 9 वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. ही मालिका 17 जूनपासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो स्टार प्रवाहने रिलीज केला आहे.
View this post on Instagram
कशी आहे शिवानीची भूमिका?
'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत ती मानसी सणस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचं साम्राज्य उभं केलं. आपल्या मुलीनेही खूप शिकून नाव कमवावं असं त्यांना वाटतं. वडिलांचं स्वप्न मानसीला पूर्ण करायचं आहे. आपल्या कॉलेजची टॉपर गायत्री मॅडमच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित आहे. पण आपल्या समोर कुणालाही जिंकू न देणाऱ्या गायत्रीच्या स्वार्थी स्वभावाची तिला कल्पना नाही. खरी ठिणगी तेव्हा पडते जेव्हा मानसी पदवी परिक्षेत टॉप करत गायत्रीचा रेकॉर्ड मोडते. मानसीला नाती जोडून ठेवायला आवडतात. कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालत नाही. नातं परिपूर्ण होण्यासाठी 'थोडं तुझं आणि थोडं माझं असावं' असं तिला वाटतं.
स्टार प्रवाह कुटुंबात जोडली जात असल्याचा आनंद
तब्बल 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे फारच उत्सुक आहे. स्टार प्रवाह कुटुंबासोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद वाटत असल्याचे शिवानी सुर्वेने सांगितले. 'स्टार प्रवाह'च्या मालिकांचे विषय, त्याची मांडणी मला खूपच भावते. त्यामुळेच 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेसाठी मी लगेच होकार दिला असल्याचे तिने सांगितले. मानसी हे पात्र मला अतिशय आवडलं. देवयानी मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. हेच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री असल्याचा विश्वास तिने व्यक्त केला.