Marathi Serial Updates : 'कलर्स मराठी' वाहिनीवर दोन नव्या सीरियल; कोणती मालिका घेणार निरोप?
Colors Marathi Channel : कलर्स मराठीकडून आता दोन नव्या मालिका सुरू करण्यात येणार आहे. या दोन मालिका सुरू होत असताना दुसरीकडे कोणत्या मालिकेचा आता शेवट होणार याबद्दल चर्चा रंगू लागली आहे.
Colors Marathi Channel : छोट्या पडद्यावर टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा आघाडी घेण्यासाठी कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीने कंबर कसली आहे. टीआरपीच्या टॉप 10 मालिकांमध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी कलर्स मराठीकडून आता दोन नव्या मालिका सुरू करण्यात येणार आहे. या दोन मालिका सुरू होत असताना दुसरीकडे कोणत्या मालिकेचा आता शेवट होणार याबद्दल चर्चा रंगू लागली आहे.
कलर्स मराठी वाहिनीवर 'इंद्रायणी' आणि 'सुख कळले' या दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. 'इंद्रायणी' (Indrayani) ही मालिका 25 मार्चपासून ऑनएअर जाणार आहे. तर, 'सुख कळले' या नव्या मालिकेची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेतून अभिनेता सागर देशमुख (Sagar Deshmukh) छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. तर, अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) जवळपास सात-आठ महिन्यानंतर मालिकेत झळकणार आहे. त्यामुळे या दोन नव्या मालिकांसाठी कोणत्या मालिका निरोप घेणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
कलर्स वाहिनीवर कोणती मालिका निरोप घेणार?
'इंद्रायणी' मालिका 25 मार्चपासून सुरू होणार आहे. ही मालिका 'सिंधुताई माझी माई' या मालिकेच्या वेळेवर मालिका सुरू होणार आहे. सध्या या मालिकेतील कथानकाचा बराचसा भाग अजूनही पूर्ण झाला नाही. त्यामुळे या मालिकेची वेळ बदलण्यात येईल अशी दाट शक्यता आहे. 'भाग्य दिले तू मला' ही मालिका रेंगाळली असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालिकेचे कथानक वाढवण्यापेक्षा त्याचा शेवट गोड होणार असल्याची चर्चा आहे. 'भाग्य दिले तू मला' ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता टेलिकास्ट होते. तर, 'रमा राघव' मालिकेत लग्नाची लगबग सुरू आहे. त्यामुळे ही मालिका निरोप घेणार का, या चर्चेलाही जोर आला आहे. ही मालिका रात्री 9 वाजता प्रसारीत होते.
'सुख कळले' च्या प्रोमोला चांगला प्रतिसाद
कलर्स मराठीने आपल्या दुसऱ्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. 'सुख कळले' (Sukh Kalale) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत स्पृहा जोशी (Spruha Joshi) आणि सागर देशमुख (Sagar Deshmukh) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता सागर देशमुख ही या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. सागर देशमुखने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा' या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी त्यांनी साकारलेल्या भूमिकेला दाद दिली होती. मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांनी दाद दिली आहे.
View this post on Instagram