(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jui Gadkari : कर्जतला बालपण, नेरुळमध्ये शिक्षण, जुई गडकरीला पहिला ब्रेक कसा मिळाला?
Jui Gadkari : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या मालिकेच्या माध्यमातून जुई गडकरी घराघरांत पोहोचत आहे. कर्जतमध्ये बालपण आणि नेरुळमध्ये शिक्षण झालेल्या जुई गडकरीला पहिला ब्रेक कसा मिळाला जाणून घ्या...
Jui Gadkari : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) घराघरांत पोहोचत आहे. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतदेखील पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेत तिने साकारलेल्या सायलीच्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. 'कल्याणी' या मालिकेच्या माध्यमातून जुईला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. आजवर तिने अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केलं आहे. कर्जतला राहणाऱ्या जुई गडकरीचा 'ठरलं तर मग'पर्यंतचा प्रवास खूपच कमाल होता.
जुईचं लहानपण कसं गेलं?
एबीपी माझाशी बोलताना जुई म्हणते,"एकत्र कुटुंबात मी लहानाची मोठी झाले आहे. आजही आम्ही सर्व कर्जतला एकत्र राहतो. माझं शिक्षण नवी-मुंबईत नेरुळमध्ये झालं आहे. त्यावेळी कर्जतला चांगल्या शाळा नसल्याने नेरुळला आत्याजवळ मी राहायला गेले. उल्हासनगरच्या सीएचएम कॉलेजमध्ये (CHM College) पुढील शिक्षण पूर्ण केलं. माझं लहानपण खूप संगीतमय गेलं आहे. माझे वडील संगीतकार असल्याने घरात दररोज वेगळ्याच्या कार्यक्रमांच्या तालमी होत असे. त्यावेळी मला संगीताची गोडी लागली.
"उल्हासनगरमधील सीएचएम कॉलेजमध्ये मी BMM in Advertising केलं. त्यानंतर Advertising in PR मध्ये मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पुढे वेलिंगकर इंस्टीट्यूट मधून MBA in Marketing केलं. उपान्त्य विशारदपर्यंत गाण्याचंही शिक्षण झालं आहे. हार्मोनियमच्याही पाच परिक्षा दिल्या आहेत. कथ्थकच्याही तीन परिक्षा झाल्या आहेत".
गडकरींची लाडकी जुई!
कुटुंबाबद्दल बोलताना जुई गडकरी म्हणाली,"एका चांगल्या आणि एकत्र कुटुंबात माझा जन्म झाला आहे. भारतीय संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धत ही गोष्ट मला खूप आवडते. पूर्वी कर्जतला आमचा वाडा होता. वाडा पाडून पुढे त्याचीच सोसायटी केली आहे. आम्ही सगळे गडकरी याच सोसायटीमध्ये राहतो. सगळे सणवार आम्ही एकत्र साजरे करतो. त्यामुळे कर्जतला जायला मला नेहमीच आवडतं. माझ्या कुटुंबातील सर्व मंडळी खूपच सर्पोटिव्ह आहेत. माझ्या फिल्डच्या गरजा कुटुंबाला माहिती आहेत. माझं माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. कुटुंबात मी सर्वांची लाडकी आहे".
View this post on Instagram
'असा' मिळाला जुई गडकरीला पहिला ब्रेक
जुई म्हणते,"अभिनय क्षेत्रात यायचं हे मी अजिबात ठरवलं नव्हतं. माझ्या एका मैत्रीणीसोबत मी एनडी स्टुडिओला गेले होते. त्यावेळी खरंतर तिला ऑडिशन द्यायची होती. दरम्यान तिथे ऑडिशन घेणाऱ्यांनी मलादेखील ऑडिशन द्यायला लावली आणि 'बाजीराव मस्तानी' या मालिकेसाठी माझं सिलेक्शन झालं. एका कामानंतर दुसरं काम, दुसऱ्यातून तिसरं असं होत गेलं. दरम्यान मी मास्टर करत होते. कर्जतच्या कर्जतमध्ये स्टुडिओ आहे, मजा येईल असा विचार करत त्यावेळी खरंतर मी काम करत होते".
जुई गडकरीने प्रेक्षकांचे मानले आभार
जुई गडकरी म्हणाली,"माझा प्रवास कायम चढता राहिला आहे, असं मी म्हणार नाही. तब्येतीच्या कारणाने मध्ये तीन वर्षे मी गॅप घेतला होता. त्या तीन वर्षातही खूप ऑफर्स येत होत्या. ही तीन वर्ष मी स्वत:साठी घेतलेली गॅप होती. पण तरीही माझा प्रवास चढता राहिला असं चाहत्यांना वाटतं याचं श्रेयदेखील त्यांनाच जातं. प्रत्येक कलाकर, प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो. प्रामाणिकपणे काम करण्यावर माझा भर असतो. पण प्रेक्षकांनी आपल्याला स्वीकारणं आणि पसंती देणं हे खूप महत्त्वाचं आहे. तीन वर्षांच्या गॅपमध्ये मी पूर्णपणे स्वत:ला वेळ दिला.
जुई पुढे म्हणाली,"या क्षेत्रातलं माझं फॅमिली बॅकग्राऊंड नव्हतं. तरीदेखील मेहनत करायची, कामे मिळवायची. माझ्या नशिबाने मला चांगली कामे मिळत गेली. इंडस्ट्रीत काम करुन आता 13 वर्षे झाली आहे. या 13 वर्षात मला अनेक गोष्टी शिकता आल्या आहेत. काय करायला हवं, काय नाही केलं पाहिजे, असे सगळ्या प्रकारचे अनुभव आले. संपूर्ण प्रवास मी एन्जॉय केला आहे.
संबंधित बातम्या