Happy Birthday Sunil Grover : ‘गुत्थी’ ते ‘डॉक्टर गुलाटी’ बनून प्रेक्षकांना हसवणारा सुनील ग्रोव्हर, वाचा त्याच्या ‘या’ प्रवासाबद्दल...
Sunil Grover Birthday : सुनील ग्रोव्हर हा एक उत्तम विनोदी अभिनेता आहे. चित्रपटांमधील आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी त्याने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Sunil Grover Birthday : आपल्या दमदार कॉमेडीने लाखो प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेता सुनील ग्रोव्हरचा (Sunil Grover) जन्म 3 ऑगस्ट 1977 रोजी हरियाणामध्ये झाला. सुनील ग्रोव्हर हा एक उत्तम विनोदी अभिनेता आहे. चित्रपटांमधील आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी त्याने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बालपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. पुढे जाऊन याच क्षेत्रात करिअर करायचे हे त्याने मनाशी पक्के केले होते. त्याने शालेय जीवनापासूनच नाटकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली होती.
'द कपिल शर्मा शो'मधून घराघरांत पोहोचलेल्या सुनीलला कॉमेडीशिवाय गंभीर भूमिकांमध्येही खूप पसंत केले जाते. सुनील ग्रोव्हर आजघडीला टीव्हीपासून फिल्म इंडस्ट्रीपर्यंत एक प्रसिद्ध नाव बनले आहे, पण यामागे त्याची अनेक वर्षांची मेहनत दडलेली आहे. त्यांच्या संघर्षाची कहाणी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.
अभिनायचे शिक्षण घेतले!
अभिनेता सुनील ग्रोव्हरचा जन्म 3 ऑगस्ट 1977 रोजी डबवली, हरियाणात झाला. सुनीलने आपल्या गावातील शाळेतूनच शिक्षण घेतले आणि वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्याने पंजाब विद्यापीठातून थिएटरची पदवी घेतली. थिएटरमध्ये मास्टर्स केल्यानंतर सुनील ग्रोव्हर अभिनयासाठी मुंबईत आला. आपली बचत आणि घरातील काही पैसे घेऊन तो मुंबईच्या एका पॉश भागात राहत होता. त्याकाळात तो महिन्याला फक्त 500 रुपये कमावत होता.
पहिल्याच शोमध्ये झाला रिप्लेस
सुरुवातीच्या काळात त्याने केवळ छोटीमोठी कामे केली होती. मात्र, जवळचे पैसे संपू लागताच त्याने हातपाय मारायला सुरुवात केली. सुनील ग्रोव्हरला कळले होते की, त्याच्यासारखे अनेक लोक मुंबई शहरात येऊन संघर्ष करून सुपरस्टार बनतात. दरम्यान त्याच्याजवळ कमाईचे कोणतेही साधन उरले नव्हते. तो मिळेल ती कामे करू लागला. याच दरम्यान सुनील ग्रोव्हरला एका टीव्ही शोमध्ये काम करण्याची ऑफर आली. या शोसाठी त्याने काही दिवस शूटिंगही केले. पण, काही दिवसानंतर त्याला कामावर बोलवणे बंद झाले. त्यानंतर सुनील ग्रोव्हरला कळले की, त्याला या शोमधून रिप्लेस करण्यात आले आहे.
मिळतील ती कामे करू लागला...
या काळात सुनील ग्रोव्हरला व्हॉईसओव्हरमध्ये काम मिळू लागले. त्यावेळी त्याला रेडिओ शो करण्याची ऑफर आली. दिल्लीत प्रसारित झालेले हा कार्यक्रम प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर हा शो संपूर्ण भारतात प्रसारित करण्यात आला. त्यानंतर सुनील ग्रोव्हरला रेडिओ, टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम मिळू लागले. सुनील बराच काळ थिएटर करत राहिला, त्यादरम्यान त्याला कॉमेडियन जसपाल भाटीच्या 'प्रोफेसर मनी प्लांट' शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या शोनंतर तो सब टीव्हीच्या 'गुटर गू' या शोमध्ये दिसला होता. हा शो एक सायलेंट कॉमेडी होता, ज्यात एकही संवाद नव्हता. या शोमधील त्याच्या अभिनयाने लोकांच्या मनावर छाप सोडली. त्यानंतर त्यांने कधीच मागे वळून पाहिले नाही.
चित्रपटांमध्येही आजमावले नशीब
सुनील ग्रोव्हरने एकामागून एक अनेक शो केले. यामध्ये ‘चला लल्लन हीरो बनने’, ‘क्या आप पांचवी फेल चंपू हैं’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘मेड इन इंडिया’ यांचा समावेश होता. सुनीलने चित्रपटांमध्येही नशीब आजमावले. 1998 मध्ये, ‘तो प्यार तो होना ही था’मध्ये छोट्याशा भूमिकेत दिसला होता. त्याने 'द लीजेंड ऑफ भगत सिंग', 'फकिरा', 'जिला गाझियाबाद', 'गब्बर इज बॅक', 'गजनी' आणि 'भारत' सारखे चित्रपट केले.
कपिल शर्मा शोमधून मिळाली ओळख!
सुनीलने खूप काम केले, पण ‘द कपिल शर्मा शो’ने त्याचे नशीब पालटले. या शोमध्ये त्याने ‘गुत्थी’, ‘रिंकू भाभी’ आणि ‘डॉ. गुलाटी’ ही पात्रं साकरून घराघरांत नाव कमावले. मात्र कपिल शर्मासोबत झालेल्या भांडणानंतर सुनीलने शोमधून काढता पाय घेतला. ऑस्ट्रेलियाला जाताना कपिल शर्माने त्याच्याशी गैरवर्तन केले होते. या घटनेनंतर तो कपिलसोबत कधीच दिसला नाही.
हेही वाचा :