(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandramukhi : चंद्रा येतेय पुन्हा घायाळ करायला; ब्लॉकबस्टर 'चंद्रमुखी'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर
Chandramukhi : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'चंद्रमुखी' सिनेमाचा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.
Chandramukhi : बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केलेल्या 'चंद्रमुखी' (Chandramukhi) सिनेमाचा 25 सप्टेंबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. 'चंद्रमुखी' सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमातील 'चंद्रा' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं.
प्रवाह पिक्चर या वाहिनीवर प्रेक्षकांना 'चंद्रमुखी' सिनेमा पाहायला मिळणार आहे. 'चंद्रमुखी' हा सिनेमा लेखक विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कांदबरीवर आधारित आहे. राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या 'चंद्रा'ची प्रेमकहाणी 'चंद्रमुखी' सिनेमात दाखवण्यात आली आहे.
View this post on Instagram
अमृता खानविलकरने या सिनेमात चंद्राची भूमिका साकारली आहे. तर खासदार दौलतराव देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसून येणार आहे. तर 'कच्चा लिंबू', 'हिरकणी' यांसारख्या सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केलेल्या प्रसाद ओकने 'चंद्रमुखी' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'चंद्रमुखी' सिनेमा प्रेक्षकांना प्रवाह पिक्चर या वाहिनीवर दुपारी एक वाजता पाहायला मिळणार आहे.
'चंद्रमुखी' सिनेमाचं कथानक काय?
एक ध्येयधुरंदर विवाहित राजकारणी जो समाजात काही सकारात्मक बदल आणू पाहात आहे. तो मोहमयी सौंदर्य, घायाळ करणाऱ्या अदा आणि बहारदार नृत्याने अनेकांना वेड लावणाऱ्या सौंदर्यवतीच्या म्हणजेच 'चंद्रा'च्या प्रेमात पडतो. तेव्हा त्याच्या राजकीय कारकिर्दीवर होणारा परिणाम आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात येणारी वादळे सिनेमात दाखवण्यात आली आहे. चंद्रा, दौलतराव आणि दमयंती यांच्या प्रेमाचा हा त्रिकोण पुढे कोणत्या वळणावर जाणार हे प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यावर कळेल.
'चंद्रमुखी' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.21 कोटींची कमाई केली होती. जागतिक पातळीवरदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 'चंद्रमुखी' सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचं प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील दिग्गजांनीदेखील कौतुक केलं आहे.
संबंधित बातम्या