Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’च्या सूत्रसंचालनाची धुरा दुसऱ्याच अभिनेत्याच्या हातात? पाहा काय म्हणाले महेश मांजरेकर...
Bigg Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 4) लवकरच चौथ्या सीजनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Bigg Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 4) लवकरच चौथ्या सीजनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या आगामी सीझनची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. ‘बिग बॉस सीझन 4’ची घोषणा झाल्यापासून चाहते आणि प्रेक्षक यावेळी घरात कोण कोण असणार याचे कयास बांधत आहेत. मात्र, या सगळ्यात कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाची भूमिका यंदा कुणाच्या पदरात पडणार?, हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदाच्या सीझनमध्ये महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार नसल्याची चर्चा सुरु होती. आता स्वतः महेश मांजरेकर यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पिपिंग मूनशी या संदर्भात बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की, ‘मी काही या बिग बॉस शोचा बांधील नाही. माझा तीन वर्षांचा करार होता. मी तीन वर्ष इमानेईतबारे हे काम केलं. हा मला आताही त्यांनी घेतलं तर, करायला आवडेल. मी तितक्याच मेहनतीने ते काम करेन. पण, जर दुसरं कुणी सूत्रसंचालन करणार असेल, तर मी त्यालाही प्रोत्साहन देईन आणि तितक्याच उत्साहाने हा कार्यक्रम बघेन.’
महेश मांजरेकरांनी गाजवले तीन सीझन!
‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनपासून महेश मांजरेकर यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे. गेले तीनही सीझन त्यांनी आपल्या धमाकेदार सूत्रसंचालानाने गाजवले. त्यांची बोलण्याची आणि स्पर्धकांची शाळा घेण्याची शैली प्रेक्षकांना विशेष आवडली. मात्र, गेल्या सीझन दरम्यान त्यांना कर्करोगाची लागण झाली होती. कर्करोगावर उपचार घेत असतानाही त्यांनी या शोचे शूटिंग केले होते. सीझनच्या शेवटच्या काही भागांत महेश मांजरेकर यांच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ जाधव सूत्रसंचालन करताना दिसला होता. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये ते नसतील, अशी अटकळ सुरुवातीपासूनच बांधली जात होती. मात्र, यावर आता त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, महेश मांजरेकर नाही तर, या भूमिकेत कुणाची वर्णी लागणार याचा अद्याप खुलासा झालेला नाही. तर, या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सिद्धार्थ जाधवच्या हाती येणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे.
पुन्हा सुरु होणार 100 दिवसांचा प्रवास!
'बिग बॉस मराठी 4' या कार्यक्रमाची घोषणा होताच त्याची चर्चा सुरू झाली आहे. आता पुन्हा एकदा स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरातील 100 दिवसांचा प्रवास सुरू होणार आहे. बिग बॉस मराठीच्या घराणे टास्क आणि वादांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'बिग बॉस मराठी 4' कोण होस्ट करणार हे अद्याप समोर आलेलं नाही.
संबंधित बातम्या :