Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेतील आप्पांना स्मृतीभंशाचा आजार; आजाराविषयी जागरुकता पसरवण्याचा मालिकेतून प्रयत्न
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील आप्पांना डिमेन्शिया म्हणजेच स्मृतीभंश झाल्याचं निदान झालं आहे.

Aai Kuthe Kay Karte: स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वीच आप्पा गायब झाल्याचा प्रसंग दाखवण्यात आला. आप्पा नेमके गेले कुठे ही चिंता घरच्यांप्रमाणेच प्रेक्षकांनाही सतावत होती. विमलमुळे आप्पांचा शोध लागला खरा, मात्र आप्पा एकाएकी गायब होण्यामागचं कारण शोधत असतानाच आप्पांच्या आजाराविषयी घरच्यांना माहित झालं. आप्पांना डिमेन्शिया म्हणजेच स्मृतीभंश झाल्याचं निदान झालं आहे.
आप्पांची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर महाबोलेंसाठी हे एक नवं आव्हान आहे. मालिकेतल्या या वळणाविषयी सांगताना किशोर महाबोले म्हणाले, ‘मालिकेतला हा प्रसंग साकारताना अभिनेता म्हणून माझा कस लागतोय. सुरुवातीला या आजाराविषयी किरकोळ वाचनात आलं होतं. यासोबतच एखादी व्यक्ती हरवल्याच्या बातम्याही कानावर पडल्या होत्या. आप्पांना झालेला हा आजार साकारताना आजूबाजूला घडणाऱ्या या गोष्टींचा मला उपयोग झाला. मालिकेत खूप आधीपासून आप्पांच्या विस्मरणाचे प्रसंग पेरण्यात आले होते. मात्र आप्पा घरातून गायब झाल्यावर त्यांचा शोध घेतल्यानंतर या आजाराची कुटुंबियांना तीव्रतेने जाणीव झाली. औषधोपचारासोबतच कुटुंबाची खंबीर साथ या आजारातून बाहेर काढू शकते. आई कुठे काय करते मालिकेतून स्मृतीभंश या आजाराविषयी जागरुकता पसरवण्याचा प्रयत्न आहे. मला प्रेक्षकांच्याही खूप प्रतिक्रिया येत आहेत.’
अरुंधतीच्या आजवरच्या प्रवासात आप्पा तिच्यासोबत सावली प्रमाणे उभे राहिले आहेत. आप्पांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी आता अरुंधतीला कंबर कसावी लागणार आहे. या सर्वात तिचं करिअर आणि तिचं आयुष्य पुन्हा एकदा पणाला लागणार आहे. आजवर अरुंधतीने कुटुंबासाठी नेहमीच त्याग केला आहे. आप्पांना या आजारपणातून अरुंधती कशी बाहेर काढणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:























