Asit Kumarr Modi : मी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय पण..., गुरुचरण परत आल्यानंतर आसिद मोदींची प्रतिक्रिया समोर
Asit Kumarr Modi : तारक मेहता फेम सोढी हा 25 दिवसांनी त्याच्या घरी परतला. त्यानंतर आता तारक मेहताचे निर्माते आसितकुमार मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Asit Kumarr Modi : मागील अनेक दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Oooltah Chashmah) फेम अभिनेता गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) म्हणजेच मालिकेतील सोढी याची बरीच चर्चा सुरु आहे. कारण हा अभिनेता जवळपास 25 दिवस बेपत्ता होता. त्यानंतर आता तो घरी परतला आहे. दरम्यान तो घरी परतल्यानंतर अनेकांना त्याच्याशी संपर्क करायचा आहे. पण त्याच्याशी अनेकांचा संपर्क होत नसल्याची माहिती सध्या समोर येत आहे. या मालिकेचे निर्माते आसितकुमार मोदी यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.
गुरुचरण घरी परतल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीदरम्यान तो कुठे होता असा प्रश्न विचारला. त्यावेळी गुरुचरण म्हणाला,"मी दुनियादारी सोडून धार्मिक यात्रेला गेलो होतो. अनेक दिवस मी अमृतसरमध्ये थांबलो होतो. त्यानंतर लुधियानासारख्या अनेक शहरांमधील गुरुद्वारमध्ये थांबलो. त्यानंतर पुन्हा आपल्या वडिलांकडे जावं, असं मला वाटलं. त्यामुळे मी पुन्हा घरी येण्याचा निर्णय घेतला". गुरुचरणी पोलीस सध्या चौकशी करत आहेत.
गरुचरण परत आल्यानंतर आसितकुमार मोदी यांची प्रतिक्रिया समोर
टाइम्स नाऊशी बोलताना असितकुमार मोदी म्हणाले की, तो परत आल्याचा मला खूप आनंद झाला आहे. मी त्याच्या कुटुंबासाठी खूप आनंदी आहे. तो बेपत्ता झाल्यापासून आम्ही सगळेच खूप तणावात होतो. पण आता आम्हाला बरं वाटतंय. मी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्याशी संपर्क होत नाहीये. मला त्याच्याशी बोलायचे आहे. मला आशा आहे की तो मला परत कॉल करेल, जेणेकरुन मला त्याच्याविषयी अधिक जाणून घेता येईल. पोलिसांनी आमच्या सेटवर येऊन सर्वांची चौकशी केली. मी तिथे नव्हतो पण सर्वांनी समन्वय साधला. त्यानंतर पोलिसांनी माझ्याशी देखील संपर्क साधला. मी त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की, काही महिन्यांपासून गुरुचरणशी माझे काही बोलणे झाले नाही.
वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केलेली
गुरुचरण सिंह 22 एप्रिल 2024 रोजी आपल्या घरुन मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. पण तो मुंबईत पोहोचला नाही तेव्हा कुटुंबीय आणि मित्र हैराण झाले. त्यानंतर 26 एप्रिल 2024 रोजी गुरुचरणच्या वडिलांनी आपला मुलगा बेपत्ता झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाअंतर्गत तक्रार दाखल केली आणि चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान समोर आलं की गुरुचरण 24 एप्रिलपर्यंत दिल्लीतच होता. त्यावेळी त्याचा मोबईल बंद झाला. या चौकशीदरम्यान समोर आलं की, गुरुचरण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तसेच अभिनेत्याला आर्थिक अडचणींचादेखील सामना करावा लागणार आहे.