सोनू सूद 'स्टेट आयकॉन ऑफ पंजाब, पंजाबच्या इलेक्शन कमिशनची घोषणा
लॉकडाऊन लागल्यानंतर सोनू सूदने समाजकार्य हाती घेतलं होतं. लॉकडाऊन वाढू लागल्यानंतर अनेक गोरगरीब-कामगार मुंबई सोडून आपआपल्या गावी परतू लागले.
मुंबई : लॉकडाऊनमध्ये अवघी इंडस्ट्री बंद असताना एक नवा नायक या कोरोनाने भारताला दिला. एकीकडे सगळी चित्रिकरणं बंद असताना.. सिनेमात काम करणारे सगळे नायक घरी बसलेले असताना एक नायक जो सिनेमातून लोकांना माहित होता तो समोर आला. अर्थात तो सिनेमात खलनायकाची भूमिका करतो. पण त्याने लॉकडाऊनमध्ये चक्क हिरोचं काम केलं. हिरो नव्हे सुपरहरो. तो होता सोनू सूद. त्याच्या या कामाची दखल पंजाब राज्याने घेतली आहे.
सोनूने लॉकडाऊनमध्ये केलेलं काम लक्षात घेऊन पंजाबच्या इलेक्शन कमिशनने सोनूला स्टेट आयकॉन ऑफ पंजाब म्हणून घोषित केलं आहे. ही बातमी सोनूसाठी अत्यानंदाचीच आहे. सोनूने तसं सांगितलंही आहे. तो म्हणतो, 'ही माझ्यासाठी खरंच आनंदाची बातमी आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता मी मला वाटलं ते काम केलं. पण त्याची अशा पद्धतीने दखल घेतली जाईल हे मला खरंच समाधान देऊन जाणारं आहे. अशा किताबांनी आपली जबाबदारी वाढते याची मला पूर्ण कल्पना आहे. सोनू सूदच्या या बोलण्यातून त्याचा नम्रपणाच दिसतो.
लॉकडाऊन लागल्यानंतर सोनू सूदने समाजकार्य हाती घेतलं होतं. लॉकडाऊन वाढू लागल्यानंतर अनेक गोरगरीब-कामगार मुंबई सोडून आपआपल्या गावी परतू लागले. एकीकडे कामाला बसलेली खीळ आणि दुसरीकडे वाढणारा लॉकडाऊन अशा कात्रीत गरीब वर्ग अडकला आणि त्याने आपल्या मूळ गावचा रस्ता धरला. फाळणीनंतरचं सर्वात मोठं स्थलांतर असं त्याचं वर्णन केलं गेलं. त्यावेळी सोनू सूद कामाला लागला. अशा कामगारांना, गरीब लोकांना त्याने बस करून दिल्या. हळूहळू त्याचं काम इतकं वाढलं की लोकांना घरी पोचवण्यापासून गरजवंतांना ट्रॅक्टर देण्यापर्यंत सोनू हरतऱ्हेने लोकांच्या कामी आला. त्यासाठी त्याला उपयोगी ठरला तो सोशल मीडिया. लोकांना अन्नदान करण्यापासून लोकांची फी भरण्यापर्यंत सगळीकडे त्याची मदत पोचली. त्याच्या कामाची दखल राज्यकर्त्यांनीही घेतली. राज्यपाल, मुख्यमंत्री आदींनी सोनूच्या कामाचं कौतुक केलं. त्याच कौतुकाची दखल पंजाबच्या इलेक्शन कमिशनने घेतली.