‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा शो रद्द, बुलढाण्यातील प्रेक्षकांची चित्रपटगृह चालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार!
Sarsenapati Hambirrao : प्रेक्षक कमी असल्याचे कारण देत चित्रपटगृह मालकाने ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा शो रद्द केल्याने संतापलेल्या प्रेक्षकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Sarsenapati Hambirrao : अभिनेते प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी मुख्य भूमिका साकारली असून, चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, असे असतानाही महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी होताना दिसत आहे. याच विरोधात आवाज उठवत बुलढाण्यातील प्रेक्षकांनी चित्रपटगृह मालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
प्रेक्षक कमी असल्याचे कारण देत चित्रपटगृह मालकाने ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा शो रद्द केल्याने संतापलेल्या प्रेक्षकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नेमकं काय झालं?
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सनी पॅलेस या चित्रपटगृहात ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे शो अजूनही सुरू आहेत. या चित्रपटाचा शो बघण्याचा प्लॅन शहरातील पेशाने वकील असलेल्या दोन मित्रांनी केला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी काल सायंकाळची सहा ते नऊच्या शोची बाल्कनीची तिकिटे त्यांनी आदल्या दिवशी आधीच आरक्षित केली होती. नियोजित वेळेनुसार हे दोघे चित्रपटगृहात सायंकाळी सहा वाजता पोहचले होते. जवळपास साडे सहा वाजेपर्यंत चित्रपटगृहातील बाल्कनीत बसूनही, चित्रपट सुरू का झाला नाही म्हणून चित्रपटगृहाच्या मॅनेजरला विचारणा केली असता, त्याने चित्रपट सुरु न करण्याचे कारण सांगितले. या शोची फक्त दोनच तिकिटे विकली गेली असून, प्रेक्षक नसल्याने हा शो रद्द करण्यात आल्याची माहिती त्याने या प्रेक्षकांना दिली.
मात्र, चित्रपटगृहाच्या मालकाने दिलेल्या या उत्तरानंतर संतापलेल्या या दोन्ही प्रेक्षकांनी थेट खामगाव शहर पोलीस स्टेशन गाठून या चित्रपटग्रहाच्या संचलकाविरुद्ध ग्राहक फसवणुकीची तक्रार दिली आहे. खामगाव शहर पोलिसांनी तक्रार स्वीकारली असून, पुढील तपास खामगाव शहर पोलीस करणार आहेत.
‘हंबीरराव’ चित्रपटाचा यशस्वी पाचवा आठवडा!
सरसेनापतींचा इतिहास जाणून घेण्यासाठी पाचव्या आठवड्यातदेखील सिनेमागृहात प्रेक्षक गर्दी करत आहेत. अशातच प्रविण तरडेंची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रविण तरडेंनी लिहिले आहे, आज जोरदार पाचवा आठवडा सुरू झाला आहे...सरसेनापतींचा भव्यदिव्य इतिहास मोठ्या पडद्यावर पाहण्यातच खरं सुख... नक्की बघा जवळच्या चित्रपटगृहात".
संबंधित बातम्या