(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shahrukh Khan Meets Aryan: कारागृहात मुलाला पाहून भावूक झाला शाहरुख खान, दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Shahrukh Khan Meets Aryan: शाहरुख खान आणि आर्यनमध्ये जवळपास 10 मिनिटं बोलणं झालं. दोघेही या भेटीत कमालीचे भावूक झाले. शाहरुखनं त्याला काही खाल्लस का? असं विचारलं.
Shahrukh Khan Meets Aryan: क्रूझ पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा अर्ज काल सत्र न्यायालयाकडून फेटाळला गेला. एनसीबीनं अटक केल्यापासून आर्यन खानला आपल्या कुटुंबियांचा चेहरा पाहता आला नव्हता. मात्र आज स्वतः शाहरुख खाननं आर्थर रोड कारागृह गाठत मुलगा आर्यनची भेट घेतली. यावेळी दोघेही भावूक झाल्याची माहिती मिळाली आहे. आर्यनला भेटल्यानंतर शाहरुखनं त्याला काही खाल्लस का? असं विचारलं. आर्यननं 'नाही' असं उत्तर देताच शाहरुखनं कारागृह अधिकाऱ्यांना आम्ही आर्यनला काही खाण्यासाठी देऊ शकतो का अशी विचारणा केली. मात्र अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या नियमांकडे बोट दाखवलं.
Shahrukh Khan : शाहरुख खाननं घेतली मुलाची भेट, आर्थर रोड कारागृहात दहा मिनिटांचा संवाद
शाहरुखनं जवळपास 10 मिनिटं शाहरुख आणि आर्यन खानमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आर्यन खानचा आर्थर रोड कारागृहातला मुक्काम मंगळवारपर्यंत वाढला आहे. काल सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर आर्यनच्या जामिनीसाठी उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. मात्र न्यायालयात आता मंगळवारी सुनावणी होणार आहे. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास शाहरुख किया कारमधून आर्थर रोड कारागृहात दाखल झाला. कोरोनाच्या काळात कारागृहातील कैद्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी बंदी घातली होती. मात्र आजपासून हे निर्बंध उठवण्यात आल्यामुळं शाहरुखला मुलगा आर्यन खानला भेटता आलं.
नेमकं काय काय घडलं...
काल जामीन अर्ज फेटाळल्यानं क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये राहावं लागणार आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज काल मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत. काल न्यायालयात कोणताही युक्तिवाद झाला नाही. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या वकिलांनी यापूर्वीच पूर्ण केले होते. सुनावणी पूर्ण झाल्यावर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता.
आर्यनच्या वकिलांसमोर 30 ॲाक्टोबर पर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर 12 दिवस कोर्टाला दिवाळीची सुटी असणार आहे. जर या 7 दिवसांत कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन कोर्टाने आपला निर्णय दिला नाही तर, आर्यन खानला दिवाळीपर्यंत जेलमध्येच रहावे लागेल. कोर्टात एनसीबीने आर्यनचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीयाशी असल्याचा आरोप करत एनडीपीएस अॅक्टच्या कलम 29 अ अंतर्गत आर्यनच्या जामीनाला विरोध केला जो कोर्टाने मान्य केला. एनसीबीला आर्यन खानच्या विदेशी दुव्यांचा संशय आहे. आर्यन खानला एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी अटक केली. एनसीबीला आर्यन खानकडून ड्रग्ज किंवा रोख रक्कम मिळाली नाही. कोर्टात एनसीबीने म्हटले होते की, आर्यन खान अरबाज मर्चंटकडे सापडलेल्या ड्रग्जचं सेवन करणार आहे. एनसीबी आर्यन खानचे ड्रग्ज चॅट, परदेशी लिंक्सचे पुरावे असल्याचा दावा करत आहे. एनसीबीने युक्तिवादात आर्यन खानच्या ड्रग्ज चॅटचा ही उल्लेख केला, ज्यात तो परदेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागताना दिसला होता. एनसीबीला आर्यनने ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा संशय आहे.