Santosh Juvekar On Raj Thackeray: "राज ठाकरे म्हणालेले, मला व्हिलन दाखवून जर...", 'झेंडा' प्रदर्शित झाल्यानंतरचा 'तो' किस्सा संतोष जुवेकरनं स्पष्टच सांगितला
Santosh Juvekar On Raj Thackeray: 'झेंडा' सिनेमावेळी राज ठाकरेंनी खूप सपोर्ट केला होता. त्यांच्या एका भूमिकेमुळे 'झेंडा' सुपरहिट ठरला, असं संतोष जुवेकरनं सांगितलं आहे.

Santosh Juvekar On Raj Thackeray: मराठीतील (Marathi Film) काही मोजक्या नावाजलेल्या सिनेमांची यादी काढली तर, अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) निर्मित, दिग्दर्शिक 'झेंडा' सिनेमाचं (Zenda Movie) नाव घेतल्याशिवाय यादीच पूर्ण होणार नाही. मराठी इंडस्ट्रीच (Marathi Industry) नाही, तर अगदी बॉलिवूडपर्यंत (Bollywood News) ज्या विषयावर कुणाचीही बोलण्याची हिंमत नव्हती, त्या विषयाला थेट अवधूतनं हात घातला होता. अवधूत गुप्तेनं स्क्रिप्ट लिहिली, अगदी शुटिंगही पूर्ण झालं पण, ज्यावेळी सिनेमा प्रदर्शित झाला, त्यावेळी मात्र मोठा गदारोळ झालेला.
'झेंडा' सिनेमाची स्क्रिप्ट त्यावेळच्या, अगदी हल्लीच्या राजकीय परिस्थितीवर (Maharashtra Politics) होती. गोष्ट तशी काल्पनिक दाखवली असली तरीसुद्धा त्या सिनेमाचा रोख प्रेक्षकांना योग्य ठिकाणी घेऊन जात होता. त्यावेळी राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे सिनेमा प्रदर्शित झाला, संपूर्ण महाराष्ट्रभरात सिनेमाचे हाऊसफुल्ल शो चालले. याबाबत सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता संतोष जुवेकरनं एका मुलाखतीत बोलताना भाष्य केलं आहे.
संतोष जुवेकर 'झेन एंटरटेनमेंट'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाला की, "अजून तवा गरमच आहे, झेंड्याचा... अजूनही त्याची धग गेलेली नाही... दिग्दर्शक, लेखक, कथाकार म्हणून अवधूत गुप्तेचा 'झेंडा' पहिला सिनेमा. अवधूतनं ज्यावेळी स्क्रिप्ट लिहिली, त्यावेळी त्यानं एका रिसॉर्टवर आम्हाला बोलावून कथा वाचून दाखवली... त्यानंतर आम्ही शांतच झालो... तू खरंच ही फिल्म करणार आहेस? नक्की... कास्टिंग काय? त्यानं पहिलंच नाव घेतलं, संत्या... कॅरेक्टरचं नावंही संत्याच ठेवलंय... माझ्यामुळेच ते संत्या नाव ठेवंलं, कारण ते कॅरेक्टर लिहिताना त्यानं मलाच डोळ्यासमोर ठेवलेलं... त्यानं ते मान्यही केलं की, संत्या मला हाच दिसतो... बाकी मला नाही कोण दिसत... मग बाकीचं कास्टिंग झालं... अवधूतनं ठरवलं कारण, त्यावेळी मित्र म्हणून आम्ही जवळ होतो की, हा कसा बोलतो, कसा राहतो... माझे इन-आऊट त्याला सगळेच माहीत होते... त्यामुळे हे कॅरेक्टर याला चांगलं जाईल... तरीसुद्धा इतकं सोपं नव्हतं..."
"त्यावेळी मराठी सिनेमा मोठा होऊ दे... असं राज ठाकरे म्हणालेले..."
संतोष जुवेकर पुढे बोलताना म्हणाला की, "त्या काळात राजसाहेबांनी खूप सपोर्ट केला होता. म्हणजे, ज्या व्यक्तीचं, ज्याचं आम्हाला टेन्शन आलं होतं की, हा सिनेमा आल्यानंतर कदाचित आम्हाला फटके किंवा आपला सिनेमा रद्द होईल... पण त्या माणसानं एक वाक्य वापरलं होतं, अनेक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. पण तेव्हा साहेबांनी सांगितलं होतं, जर माझं नाव किंवा मला जर व्हिलन दाखवून मराठी सिनेमा मोठा होणार असेल तर, मला काही हरकत नाही... मराठी सिनेमा मोठा होऊ दे..."
"मला आठवतं वंदना टॉकीजच्या बाहेर, शो बंद पाडा असं म्हणणारे उभे होते. मी आणि अवधूत तिथे गेले होतो. आणि तिथे मनसेचे कार्यकर्ते आले होते. आम्ही तिथे गेलो आणि तिथून आम्ही फोन केला, अमेय खोपकरला, तिकडून फोन आला साहेबांचा... पिक्चर चालू करायचाय, बाजूला व्हा. आणि ते सगळे जेव्हा आतमध्ये येऊन बसले पिक्चर बघायला, पूर्ण पिक्चर जे बंद करायला आले होते, ते आमच्यासोबत बसले, पूर्ण सिनेमा पाहिला आणि बाहेर येऊन बोलले की, नाही हो चांगला आहे, हा सिनेमा...", असं संतोषने पुढे सांगितलं.
"सोशल मीडियावर व्यक्त होण्याची घाई करू नका..."
"मला असं वाटतं की, एक सिनेमा पूर्णपणे... कोणतीही कलाकृती, कोणतीही गोष्ट ती पूर्ण ऐका, ती समजून घ्या आणि मग बोला... तुम्हाला जी सोशल मीडियावर व्यक्त होण्याची घाई असते... पहिली माझी कमेंट, पहिले लाईक्स मलाच आले पाहिजे, पहिली माझी पोस्ट शेअर झाली पाहिजे... हा अट्टाहास नको... कारण तुमच्या पहिलं येण्यामागे कोणाचेतरी प्रॉब्लेम होतील, हे लक्षात ठेवा...", असं संतोष जुवेकरनं सांगितलं.
दरम्यान, 'झेंडा' या सिनेमामध्ये सिद्धार्थ चांदेकर, संतोष जुवेकर , चिन्मय मांडलेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. अशातच संतोष जुवेकरच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'छावा' सिनेमात संतोष जुवेकर झळकला होता. अशातच आता तो पुन्हा रंगभूमीवर कमबॅक करत असून मराठीतलं गाजलेलं नाटक 'घाशीराम कोतवाल' आता हिंदीत येत आहे. त्यातच संतोष जुवेकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























