'आशा आईंची 'ती' इच्छा, त्यांना राजा शिवाजी सिनेमा...'; रितेश देशमुख भावूक, आशा भोसलेंच्या आठवणींना उजाळा
Asha Bhosle wanted to watch Raja Shivaji movie: 'राजा शिवाजी' सिनेमाच्या प्रोमोशनदरम्यान रितेश देशमुखने आशा भोसलेंच्या आठवणींना उजाळा दिला.

Riteish Deshmukh On Asha Bhosle: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमात त्यानं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची बाजूही रितेश देशमुखने सांभाळली. या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर उत्तम घौडदौड सुरू आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करत 'राजा शिवाजी' सिनेमा नवा विक्रम रचण्यास सज्ज झाला आहे. सिनेमाच्या प्रोमोशनसाठी खास रितेश देशमुख 'इंडियन आयडॉल'च्या सेटवर गेला. यावेळी त्यानं आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच भावनिक किस्सा शेअर केला. आशा भोसले (Asha Bhosle) यांना 'राजा शिवाजी' हा सिनेमा पाहायचा होता, असा भावनिक खुलासा रितेश देशमुखने प्रोमोशनमध्ये केला.
रितेश देशमुखने आशा भोसले यांच्या संबंधित एक भावनिक आठवण शेअर केली. 'जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावरुन अशा प्रकारे हात फिरवला, जशी एखादी आई आपल्या बाळाला कुरवाळते. मी त्यांना आशा आई म्हणायचो. आजही त्याच नावाने हाक मारतो', असं रितेश म्हणाला. 'आम्ही एके दिवशी सहज गप्पा मारत होतो. त्यांनी मला माझ्या आवडत्या पदार्थाबद्दल विचारलं. त्यांनी माझ्यासाठी माझ्या आवडीचं जेवण केलं. मला जेवणासाठी घरी बोलावलं. मी गेलो आणि आम्ही जेवण केलं. खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या', असं रितेश देशमुख म्हणाला.
आशा भोसले यांना 'राजा शिवाजी' हा सिनेमा बघायचा होता (Riteish Deshmukh shares an emotional memory of Asha Bhosle)
दोघांचं शेवटचं बोलणं नेमकं कधी झालं? शेवटच्या संभाषणामध्ये नेमकं काय बोलणं झालं, याबद्दल माहिती रितेश देशमुखने दिली. आशा भोसले यांनी 'राजा शिवाजी' चित्रपटाला पाठिंबा दिला होता, असंही रितेश देशमुख म्हणाला. तो क्षण आठवून रितेश देशमुख म्हणाला, 'माझा तुला आशिर्वाद आहे. चांगला चित्रपट बनव. प्रदर्शित झाल्यानंतर मला हा चित्रपट बघायचा आहे', असं रितेश देशमुख म्हणाला.
'दोन आठवड्यांपूर्वी मला त्यांच्या कुटुंबाकडून फोन आला होता. अशाजींची इच्छा होती, त्यांना हा सिनेमा पाहायचा होता'. शेवटी रितेश देशमुख भावुक झाला होता. 'दुर्देवाने आशा आई हा चित्रपट पाहू शकल्या नाहीत. मला आशा आईंची खूप आठवण येते', असं म्हणत रितेश देशमुखने हा भावनिक किस्सा शेअर केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:





















