Purshottam Berde on laxmikant berde : 'लक्ष्याने स्वत:ला संपवलं', भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबत केला मोठा खुलासा
Purshottam Berde on laxmikant berde : सर्वांचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबत त्यांचा भाऊ पुरुषोत्तम बर्डे यांनी भाष्य केलं आहे.
Purshottam Berde on laxmikant berde : मराठी सिनेसृष्टीतल्या सुवर्णकाळाविषयी जेव्हा उल्लेख केला जातो, तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde) यांचं नाव आग्रहाने घेतलं जातं. मराठीसह बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांच्या अभिनयाचे आणि त्यांचे आजही तितकचे चाहते आहेत. त्यांचे अनेक चित्रपट आजही मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. या हरहुन्नरी अभिनेत्याचे 16 डिसेंबर 2004 मध्ये निधन झालं. पण त्यांचा शेवट नेमका कसा झाला याविषयी त्यांचा भाऊ आणि निर्माते, लेखक पुरुषोत्तम बेर्डे (Purshottam Berde) यांनी भाष्य केलं आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाच्या बातमीमुळे अनेकांना धक्का बसला होता. त्यांच्याबरोबर काम केलेल्या अनेक कलाकारांनी याविषयी अनेकदा बोलूनही दाखवलं होतं. सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, अशोक सराफ या त्यांच्या सहकलाकरांनी आणि मित्रांकडून आजही प्रत्येक कार्यक्रमात लक्ष्या मामांचा उल्लेख केला जातो. पण यादरम्यान त्यांचा भाऊ आणि निर्माते पुरुषोत्तम बेर्डे यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
लक्ष्याने स्वत:ला संपवलं - पुरुषोत्तम बेर्डे
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. यावर बोलताना पुरुषोत्तम बेर्डे यांनी एका वेब पोर्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, लक्ष्याने स्वत:ला संपवलं. ज्यावेळी त्याला त्याच्या शरीराकडे सर्वात जास्त गरज होती, तेव्हा त्याने ते केलं नाही. शरीर हे तुमचं फार महत्त्वाचं माध्यम असतं, जर तेच नसेल तर तुम्ही फोटोशिवाय कुठे जाणार. त्यामुळे जेव्हा तुमचं शरीर नष्ट होईल, तेव्हा तुमचं सगळं संपतं, हेच नेमकं लक्ष्याच्या बाबतीत झालं.
मी देखील त्याला सांगू शकलो नाही - पुरुषोत्तम बेर्डे
लक्ष्याने लहानपणापासूनच कोणाचं ऐकलं नाही. मी देखील त्याला कधी सांगू शकलो नाही, तू ह्या गोष्टींपासून लांब रहा. जेव्हापासून तो सुपरस्टार झाला तेव्हा त्याचं एक आयुष्य सुरु झालं. पण त्यापासून लांब जाण्यासाठी त्याला अध्यात्मची गरज होती. लक्ष्याने कायम त्याला जे हवं तेच केलं. त्यामुळे जर त्याने कोणाचं तरी ऐकायला हवं होतं. त्यामुळे ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी खंत आहे की, एक भाऊ म्हणून एक मित्र म्हणून मी त्याच्या त्या काळामध्ये काहीच करु शकलो नाही. जे त्याच्यासाठी महत्त्वाचं माध्यम होतं शरीर हेच त्यानं संपवलं आणि स्वत:लाही. पण याची जाणीव त्याला अगदी शेवटाला झाली. तो माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याकडून एका गंभीर विषयावर नाटक लिहून घेतलं. सर आली धावून हे त्याच्या शेवटच्या काळातलं नाटक, असं देखील पुरुषोत्तम बेर्डे यांनी यावेळी म्हटलं.