Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका लवकरच एस. एस. राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित ‘वाराणसी’ या अॅक्शन सिनेमातही दिसणार आहे.

Priyanka Chopra: जागतिक स्तरावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आता आणखी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. प्रियांका आगामी साय-फाय अॅक्शन थ्रिलर ‘ब्लूफ्लाय’मध्ये ऑस्कर विजेते अभिनेते रसेल क्रो यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ‘द व्हाइट टायगर’, ‘द ब्लफ’ आणि ‘हेड्स ऑफ स्टेट’नंतर प्रियांकाच्या या नव्या प्रोजेक्टची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
‘ब्लूफ्लाय’मध्ये प्रियांका चोप्रा जोनस आणि अकॅडमी अवॉर्ड विजेते रसेल क्रो प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘Predators’ आणि ‘Stranger Things’साठी प्रसिद्ध असलेले निम्रॉड अँटल या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. डेव्हिड फ्रिजेरिओ, विल्यम यूबँक आणि कार्लाइल यूबँक यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे.प्रियांकासाठी हा आणखी एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट आहे. नुकतीच तिची ऑर्लॅंडो ब्लूमसोबत आगामी सर्व्हायव्हल थ्रिलर ‘Reset’मध्ये मुख्य भूमिका असल्याची घोषणा झाली होती. याशिवाय यावर्षीच्या सुरुवातीला प्रियांका ‘The Bluff’मध्ये झळकली होती. त्यानंतर तिने इद्रिस एल्बा आणि जॉन सीना यांच्यासोबत ‘Heads of State’मध्ये काम केलं. प्रियांका लवकरच एस. एस. राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित ‘वाराणसी’ या अॅक्शन सिनेमातही दिसणार आहे. हा सिनेमा 7 एप्रिल 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे.
काय आहे ‘ब्लूफ्लाय’ची कथा?
‘ब्लूफ्लाय’ची कथा काँगोच्या घनदाट जंगलाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. एका दुःखाने ग्रासलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अनुवादकाला एका गुप्त ब्लॅक-ऑप्स मोहिमेत सहभागी करून घेतलं जातं. अशा एका विमानाचा शोध घेणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट असतं, ज्याचं अस्तित्वच नसल्याचं मानलं जातं. विशेष ऑपरेशन्सची टीम मिलिशियाच्या ताब्यात असलेल्या प्रदेशातून नदीमार्गे पुढे जाते. मात्र, ही मोहीम जसजशी पुढे सरकते तसतशी परिस्थिती अधिक भयावह होत जाते. टीम त्या रहस्यमय विमानाच्या जवळ पोहोचते, तेव्हा त्यांना या मोहिमेमागचं धक्कादायक सत्य समजू लागतं. हे विमान परत आणण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलेलं नसल्याचं हळूहळू स्पष्ट होतं.
याच वर्षी सुरू होणार शूटिंग
‘ब्लूफ्लाय’ हा विज्ञानकथेच्या धाडसी संकल्पनेवर आधारित व्यक्तिरेखाकेंद्री अॅक्शन थ्रिलर असणार आहे. सिनेमाचं मुख्य चित्रीकरण यावर्षीच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू होणार आहे. Highland Film Group या सिनेमाच्या जगभरातील वितरण हक्कांचं काम पाहणार असून TIFFमध्ये सिनेमाच्या विक्रीची अधिकृत सुरुवात केली जाणार आहे. प्रियांकाच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्सच्या यादीत आता ‘ब्लूफ्लाय’ची भर पडली आहे. त्यामुळे प्रियांका आणि रसेल क्रोची जोडी या साय-फाय थ्रिलरमध्ये कशी दिसणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.






















