(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prasad Oak Birthday : जेव्हा प्रसाद ओक भर सेटवर अन् चालू शुटींगमध्ये बायकोवर ओरडतो, मंजिरी ओकने सांगितला धम्माल किस्सा
Prasad Oak Birthday : अभिनेता प्रसाद ओकच्या वाढदिवासनिमित्त त्याची बायको मंजिरी ओक हिने शेअर केलेला एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Prasad Oak Birthday : अभिनेता प्रसाद ओकचा (Prasad Oak) आज वाढदिवस असून सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून आणि मित्र परिवाराकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अभिनेता प्रसाद ओकने आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट देत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. हिरकणी (Hirkani) सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करुन प्रसाद दिग्दर्शक म्हणून देखील प्रेक्षकांच्या तितकाच पसंतीस पडला. त्याची आणि मंजिरी (Manijiri Oak) जोडी देखील सिनेसृष्टीतलं पावर कपल म्हणून ओळखली जाते. हिरकणी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान प्रसाद मंजिरीवर खूप ओरडला होता, त्याचाच एक किस्सा मंजिरीने सांगितला.
हिरकणी या चित्रपटासाठी मंजिरीने सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली होती. तिने या चित्रपटात प्रसादला साथ दिली होती. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रसाद मंजिरीवर खूप ओरडला होता. त्यानंतर मंजिरी देखील खूप रडली होती, असा एक मजेशीर किस्सा मंजिरीने एका मुलाखतीदरम्यान शेअर केला होता. प्रसादच्या वाढदिवासाच्या निमित्ताने मंजिरीचा हा किस्सा सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
जेव्हा प्रसाद मंजिरीला ओरडतो
हिरकणी चित्रपटात सोनाली कुलकर्णी ही मुख्य भूमिकेत होती. त्यावेळी तिने नेसलेली साडी ही पुढेही लागणार होती. उनामुळे त्या साडीचे कोरडे रंग हाताला लागत होते. त्यातच त्या साडीवर थोडं पाणी सांडलं. त्यामुळे साडीला ओला रंग देखील लागला. त्यावेळी चालू सीनमध्ये मंजिरी जोरात "माझी साडी" असं ओरडली. त्यावेळी प्रसाद तिच्यावर खूप ओरडला. त्यानंतर मंजिरी चित्रपटात गडावर ज्या झोपड्या दाखवल्या त्याच्या मागे जाऊन रडत होती. तेव्हा सोनालीने मंजिरीला समजावलं. त्यानंतर सेटवर जवळपास दोन तास पूर्णपणे शांतता होती आणि पुढचे सगळे सीन पटापट झाले. शुटींगच्या तिसऱ्याच दिवशी हे सगळं झालं होतं, असा एक धम्माल किस्सा मंजिरीने मुलाखतीदरम्यान शेअर केला होता.
'अशी' आहे प्रसाद-मंजिरीची लव्हस्टोरी (Prasad Oak Lovestory)
प्रसाद ओक आणि मंजिरी ओकची पहिली भेटच एका अभिनय शिबिरामध्ये झाली होती. हे शिबिर प्रसादनेच आयोजित केलं होतं. तीन महिन्यांच्या या शिबिरादरम्यान प्रसाद-मंजिरीची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. मराठी मनोरंजनसृष्टीतील पॉवर कपल म्हणून ते ओळखले जातात.