Oscars 2022 : ‘ऑस्कर’ला लता मंगेशकर आणि दिलीपकुमारांचा पडला विसर? संतप्त चाहते म्हणतात...
Oscars 2022 : गत वर्षी 7 जुलै रोजी दिलीप कुमार यांचे निधन झाले, तर या वर्षी 6 फेब्रुवारी रोजी लता मंगेशकर यांनीदेखील जगाचा निरोप घेतला.
Oscars 2022 : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि ‘गानकोकिळा’ लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा अकादमी अवॉर्ड्सच्या ‘इन मेमोरिअम’ (Oscar 2022) विभागात उल्लेख करण्यात आला नाही, ज्यामुळे चाहते संतप्त झाले आहेत. गत वर्षी 7 जुलै रोजी दिलीप कुमार यांचे निधन झाले, तर या वर्षी 6 फेब्रुवारी रोजी लता मंगेशकर यांनीदेखील जगाचा निरोप घेतला.
या वर्षीच्या ऑस्करच्या ‘इन मेमोरिअम’ विभागाने जागतिक चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या सगळ्या कलाकारांना श्रद्धांजली वाहिली, ज्यांनी गत वर्षांत या जगाचा निरोप घेतला. मात्र, अलीकडेच निवर्तलेल्या दोन प्रतिष्ठित भारतीय दिग्गजांच्या कार्याचा आणि स्मृतीचा सन्मान करण्यात हा विभाग अयशस्वी ठरला आहे. या सोहळ्यात अभिनेता दिलीप कुमार आणि गायिका लता मंगेशकर यांच्या नावाचा उल्लेख झाला नसल्याने प्रेक्षकही या सोहळ्यावर नाराज झाले आहेत.
दिग्गजांच्या निधनाने भारतीय मनोरंजनविश्वात निर्माण झाली पोकळी!
गेल्या वर्षी 7 जुलै रोजी कुमार यांचे निधन झाले, तर मंगेशकर यांचे यावर्षी 6 फेब्रुवारी रोजी निधन झाले. दोन्ही व्यक्तिमत्त्वांनी चित्रपट आणि संगीत जगतात, तसेच भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय मनोरंजन विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार हे देशातील पहिले ‘सुपरस्टार’ अभिनेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी ‘आन’, ‘देवदास’, ‘नया दौर’ यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ आणि ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’सह भारत सरकारच्या अनेक प्रतिष्ठित सन्मानांचे ते विजेते होते.
दरम्यान, 36हून अधिक भारतीय भाषांमध्ये गाणी गाणाऱ्या लता मंगेशकर यांचाही कलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला होता. लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने केवळ भारतीयच नाहीतर, जागतिक स्तरांवरील प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.
‘इन मेमोरिअम’ यादीत यांचा समावेश
ऑस्करच्या या यादीत सेलिब्रिटी सिडनी पॉटियर, बेट्टी व्हाईट आणि विल्यम हर्ट यांचा समावेश होता. यापूर्वी, अकादमीने आपल्या इन मेमोरिअम विभागात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि ऋषी कपूर यांचा समावेश केला होता. मात्र यावर्षी भारतातील दोन दिग्गजांची नावे या सोहळ्यातून वागली गेली आहेत.
संतप्त चाहते म्हणतात...
सोशल मीडियावर चाहत्यांनी या प्रकरणी आपला राग व्यक्त केला आहे. एका युझरने लिहिले, ‘मी खरंतर ऑस्कर इन मेमोरिअममध्ये लता मंगेशकर यांचा उल्लेख केला जाईल अशी अपेक्षा करत होतो. पण...’ आणखी एकाने ट्विट केले की, ‘#Oscars2022 #बॉलिवूड फेम - नाइटिंगेल ऑफ इंडिया - लतामंगेशकर यांचा गेल्या वर्षी निधन झालेल्या चित्रपटक्षेत्रातील लोकांमध्ये उल्लेख देखील नाही.’
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Oscars 2022 : ऑस्कर गोज टू... ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ड्युन सिनेमाचा डंका; पाहा नॉमिनेटेड आणि विजेत्यांची यादी
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले...
- Oscar 2022 : ऑस्कर सोहळ्याला गालबोट, पत्नी जॅडा स्मिथवरील कमेंटमुळे भडकला सुपरस्टार विल स्मिथ, ख्रिस रॉकच्या लगावली कानाखाली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha