(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Varun Dhawan Wedding | मोबाईल बंदीपासून कोविड चाचणीपर्यंत, वरुण- नताशाच्या लग्नासाठी 'नियम व अटी लागू'
परदेशवारीला जाण्याऐवजी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि अनेकांच्याच पसंतीच्या अशा अलिबाग या ठिकाणाला पसंती दिली आहे
Varun Dhawan Wedding अवघ्या काही तासांमध्येच अभिनेता वरुण धवन आणि त्याची बालमैत्रीण नताशा दलाल (Natasha Dalal) विवाहबंधनात अडकणार आहेत. या विवाहसोहळ्यासाठी नताशा आणि वरुणनं परदेशवारीला जाण्याऐवजी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि अनेकांच्याच पसंतीच्या अशा अलिबाग या ठिकाणाला पसंती दिली आहे.
अथांग समुद्रकिनारा लाभलेल्या या ठिकाणी एका आलिशान बीच रिसॉर्टमध्ये हा सेलिब्रिटी विवाहसोहळा पार पडणार आहे. ज्यासाठी मोबाईल वापराबाबचे निर्बंध असणार आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग अद्यापही टीकून असल्यामुळं त्या धर्तीवर या विवाहसोहळ्यातही काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करण्यात आल्याचं कळत आहे.
दोघांच्याही कुटुंबीयांकडून आमंत्रित करण्यात आलेली पाहुणे मंडळी विवाहस्थळी पोहोचली आहेत. पाहुणे आणि लग्नसोहळा अशा दोन गोष्टी एकत्र आल्या की फोटो, धम्माल आलीच. पण, वरुणच्या लग्नसोहळ्यामध्ये मोबाईल वापरांबाबत काही निर्बंध आहेत. आपल्या जीवनातील या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर लीक होऊ नयेत यासाठी नताशानं विवाहस्थळी मोबाईल वापरास बंदीचा आग्रह धरल्याचं कळत आहे.
wedding Bells | मिताली- सिद्धार्थला हळद लागली होssss
विवाहस्थळ म्हणून निवड करण्यात आलेल्या रिस़ॉर्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या दिवसांत मोबाईल वापरता येणार नाही आहे. आता पाहुण्यांमध्येही मोबाईल न वापरण्याबाबत सर्वच पाहुण्यांसाठी हा नियम लागू आहे, की कुटुंबासाठी तो शिथिल करण्यात येईल हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
कोविड चाचणी अहवालाची सक्ती
वरुण आणि नताशा दलाल यांच्या विवाहसोहळ्यासाठी येणाऱ्या कुटुंबीय आणि पाहुणे मंडळींना कोविड चाचणी करुनच या ठिकाणी प्रवेश देण्यात आला आहे. सर्वांनीच आपल्या कोविड 19 चाचणीचे अहवाल वेडिंग प्लॅनर्सना देणं अपेक्षित होतं. याशिवाय इथं मास्क आणि सॅनिटायझरची उपलब्धता असेल याचीही काळजी घेण्यात आली आहे. शिवाय निर्जंतुकीकरणासाठी UVC disinfecting device सुद्धा इथं विविध ठिकाणी ठेवण्यात आलं आहे.