Mahesh Manjrekar : ‘पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका’, महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा!
Mahesh Manjrekar : 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' या चित्रपटातील काही वादग्रस्त दृष्यांवरून मुंबई पोलिसांनी महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjrekar) 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) या चित्रपटात अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप करत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना आता हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.
'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' या चित्रपटातील काही वादग्रस्त दृष्यांवरून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चित्रपटातील लहान मुलांशी संबंधित काही आक्षेपार्ह दृश्यांवरून माहिम पोलीस स्टेशनमध्ये 'पोक्सो' आणि 'आयटी' कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' या चित्रपटात किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाची एक वेगळी कथा प्रेक्षकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कथेची पार्श्वभूमी गिरणी संप, गिरणगावातील चाळींशी संबंधित होती. किशोरवयीन मुलाचे नात्यातील प्रौढ महिलेशी संबंध चित्रपटात दाखवण्यात आले होते. यावर गिरणगावातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. महेश मांजरेकर यांच्या चित्रपटामुळे गिरणगाव आणि चाळीतील मुलांबाबत दिशाभूल होत असल्याचा मुद्दा अनेकांनी मांडला होता. त्यामुळेच मुंबई पोलिसांनी महेश मांजरेकरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यावर मुंबई सत्र न्यायालयातील पोक्सो कोर्टाने चौकशी करून आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता.
अटकेपासून दिलासा देण्यास न्यायालयाने दिला होता नकार!
या आधी न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली होती. ज्यात अटकेची कारवाई करण्यापासून मुंबई पोलिसांना रोखण्यात यावं, अशी मागणी मांजरेकर यांच्यावतीनं करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारकने याला विरोध केला होता. त्यामुळे हायकोर्टाने मांजरेकरांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत, सोमवारी नियमित खंडपीठापुढे दाद मागण्याचे निर्देश महेश मांजरेकरांना दिले होते.
हेही वाचा :
- Mahesh Manjrekar : महेश मांजरेकांना अटकेपासून कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
- Lock Upp Contestants Full List : कंगनाच्या लॉकअपमध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग
- House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha