नाटक वेड्यांसाठी खुशखबर! दिवाळीच्या सुमारास जुन्या नव्या नाटकांची मेजवानी, सखाराम बाईंडर, संगीत देवबाभळीसह 'ही' नाटकं रंगभूमी गाजवणार
नवनवीन विषय, तरुण कलाकारांचा सहभाग, आधुनिकतेचा संदर्भ आणि सामाजिक वास्तव यांचा एकत्रित विचार देणारी ही नाटकं येत असल्याने प्रेक्षकही आनंदित झाले आहेत .

Marathi Upcoming Natak: मराठी रंगभूमीवर कायमच नवनवीन प्रयोग होताना दिसतात. सध्या तरुण लेखकांचीही संख्या वाढत असताना नवनवीन विषय, संहिता समोर येत आहेत. सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी नाटककारांसाठी मोठ्या धावपळीचा असतो. राज्य नाट्य, पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया अशा अनेक स्पर्धांमधून रंगकर्मी आपली नवी नाटकं रंगभूमीवर आणतात. याशिवाय प्रायोगिक, हौशी, दिग्गज दिग्दर्शकांचा कलाकृतीही रंगमंचावर साकारल्या जातात. दिवाळी जवळ येतीये तशी रंगकर्मींची धावपळ वाढताना दिसतेय. लवकरच मराठी रंगभूमी नवनव्या नाटकांनी जाणार आहे. अनेक नव्या संहिता, पुनरुज्जीवीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे नाटकवेड्यांचा उत्साह वाढला आहे. (Marathi Natak)
माणूस नावाचा दिवटा, संगीत देवबाभळी, शांती ते क्रांती, करायचं प्रेम तर मनापासून अशा नव्या संहिता रंगभूमीवर येणार आहेत .तर सखाराम बाईंडर, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला, सविता दामोदर परांजपे, व्यक्ती आणि वल्ली अशी पुनरुज्जीवीत नाटकं पुन्हा प्रेक्षकांसमोर दिमाखात उभी ठाकणार आहेत . नवनवीन विषय, तरुण कलाकारांचा सहभाग, आधुनिकतेचा संदर्भ आणि सामाजिक वास्तव यांचा एकत्रित विचार देणारी ही नाटकं येत असल्याने प्रेक्षकही आनंदित झाले आहेत .
सखाराम बाईंडरची नवी इनिंग !
सध्या विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाईंडर नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरलं आहे. सखाराम बाईंडरच्या भूमिकेत पुन्हा एकदा अभिनेते सयाजी शिंदे नव्या दमाने समोर आले असून या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग सुरू झाले आहेत . या नाटकाला सध्या प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय . अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह नेहा जोशी, अभिजीत झुंजारराव, अनुष्का विश्वास, चरण जाधव या कलाकारांची टीम असणार आहे .1972 मध्ये विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं सखाराम बाईंडर हे नाटक स्त्री पुरुष संबंधांवरचं नाटक आहे .पारंपरिक तंत्राला धक्का देणारा हा स्फोटक विषय तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणिवांचा भाग होता .
कोणत्या नव्या संहिता समोर येणार ?
शेवग्याच्या शेंगा : गजेंद्र अहिरे लिखित आणि दिग्दर्शक शेवग्याच्या शेंगा हे मराठी नाटक पुन्हा रंगमंचावर आले आहे .ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची जोडीसह अंकिता दीप्ती, साकार देसाई, अपूर्वा गोरे, नंदिता पाटकर या कलाकारांची फौज प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे .
नाट्यसंगीताची वाटचाल : लेखक व दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीचं हे नाटक आता सुरांचा स्वरूपात रंगमंचावर येणार आहे .यात गायक राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे अभिनेता अमेय वाघ समोर येणार आहेत . आपली जुनी नाट्यगीत, नाट्यपरंपरा हा काहीतरी रताळ विषय आहे अशी धारणा मोडून काढणारं हे नवं नाटक लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे .
दिग्गज दिग्दर्शकांची नाटकं रंगभूमी गाजवणार
सेकंड इनिंग हे लेखक व अभिनेते संजय मोने यांनी लिहिलेलं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .तर दुसरीकडे अनेक नाटकांशी जोडले गेलेले ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांचं माणूस नावाचा दिवटा, करायचं प्रेम तर मनापासून ही दोन नाटकं प्रेक्षकांसमोर येणार आहे . याशिवाय शरद पोंक्षे शांती ते क्रांती दिग्दर्शक अभिजीत खाडे यांचं मुक्तिधाम तर दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांचं संगीत संन्यस्त खड्ग ही नाटकंही प्रेक्षकांचं मनोरंजन करतील हे नक्की !
























