(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathi Movie : मराठी सिनेमाची 2016 पासून ऑस्करसाठी प्रतीक्षा; यंदाही तीन सिनेमे शर्यतीत, पण बाजी हुकलीच
Marathi Movie : यंदाच्या ऑस्करच्या शर्यतीत तीन मराठी सिनेमे होते. त्यामुळे मराठी सिनेमाची ऑस्करसाठीची बाजी यंदाही हुकलीच आहे.
Marathi Movie in Oscar : श्वास (Shwaas), हरिश्चंद्राची फॅक्ट्री (Harishchandrachi Factory) आणि कोर्ट (Court) या तीन सिनेमांनी बाजी मारत थेट ऑस्कर (Oscar) सोहळा गाठला होता. पण ऑस्करची दारं उघडण्यासाठी मराठी सिनेमाला 2005 साल उजाडलं होतं. थेट ऑस्करमध्ये भिडणारा श्वास हा पहिला सिनेमा ठरला होता. त्यानंतर 2010 मध्ये हरिश्चंद्राची फॅक्ट्री या सिनेमाने ऑस्करची दारं उघडली. यानंतर थेट 2016 मध्ये कोर्ट या सिनेमाने हा मान मिळवला. पण या सिनेमाच्या एन्ट्रीनंतर मराठी सिनेमा आजही ऑस्करच्या प्रतीक्षेतच आहे.
ऑस्कर 2025 साठी जवळपास 29 सिनेमांची निवड करण्यात आली होती. पण त्यामध्ये लापता लेडीज या सिनेमाने बाजी मारत ऑस्करची झेप घेतली. या 29 सिनेमांमध्ये तीन मराठी सिनेमांचाही समावेश होता. यामध्ये विशेष म्हणजे नवज्योत बांदिवडेकर दिग्दर्शित घरत गणपती या सिनेमाला सहाव्या क्रमांकाचं स्थान होतं. त्यानंतर स्वरगंधर्व सुधीर फडके आणि गाठ हे सिनेमे देखील शर्यतीत होते. पण ही बाजी यंदाही हुकलीच आहे.
2016 नंतर एकही मराठी सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत नाही
भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत जाणारा कोर्ट हा शेवटचा मराठी सिनेमा होता. त्यानंतर एकाही सिनेमाला ऑस्करमध्ये स्थान मिळालं नाही. यंदाच्या शर्यतीत तीन मराठी सिनेमांची वर्णी लागली होती. पण त्यामध्ये किरण रावच्या लापता लेडीज या हिंदी सिनेमाने बाजी मारली. 2005, 2010 आणि 2016 ही तीनच वर्ष मराठी सिनेमा ऑस्करच्या शर्यतीमध्ये होता.
दरम्यान मागील काही वर्षांपासून मराठी सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. कच्चा लिंबू, न्यूड, आत्मपॅम्फ्लेट यांसारख्या अनेक सिनेमांची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे.इतकच नव्हे तर अनेक सिनेमे आंतरराष्ट्रीय पातळीवरही नावाजले गेले आहेत. मग मराठी सिनेमे ऑस्करपर्यंत का पोहचू शकत नाही, असा प्रश्न प्रत्येक वर्षी उभा राहतो.
किरण रावचा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत
किरण राव दिग्दर्शित आणि आमिर खान निर्मित लापता लेडीज हा सिनेमा भारताकडून यंदाच्या ऑस्कर शर्यतीत पाठवण्यात आला आहे. किरण रावचा हा पहिलाच सिनेमा असून त्याने ऑस्करची बाजी मारली आहे. 'लापता लेडीज', या वर्षीच्या स्लीपर हिटपैकी एक, ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री असेल. भारतीय फिल्म फेडरेशनच्या समितीनं 29 चित्रपटांच्या यादीतून 'लापता लेडीज'ची ऑस्कर 2025 साठी अधिकृत एन्ट्री म्हणून निवड केली आहे. समितीसमोर सादर झालेल्या 29 चित्रपटांच्या यादीत 'ॲनिमल' आणि 'अट्टम' या चित्रपटांचाही समावेश होता.