Majha Maharashtra Majha Vision : आज काहीही कलाकृती करणं उपयोगाचं नाही, प्रेक्षक लगेच पकडतात : सचिन पिळगावकर
आता काहीही करुन उपयोगाचं नाही कारण प्रेक्षक लगेच पकडतात.आधी प्रेक्षक सुधरले आणि प्रेक्षकांनी आम्हाला बदलवलं. तरीही चुका आजही घडतच आहेत, असं ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले.
![Majha Maharashtra Majha Vision : आज काहीही कलाकृती करणं उपयोगाचं नाही, प्रेक्षक लगेच पकडतात : सचिन पिळगावकर Majha Maharashtra majha vision 2021 Live update sachin pilgaonkar on Marathi film entertainment industry Majha Maharashtra Majha Vision : आज काहीही कलाकृती करणं उपयोगाचं नाही, प्रेक्षक लगेच पकडतात : सचिन पिळगावकर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/12/42e1c109b7851dc11b1818794f33a96b_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आज प्रेक्षक अत्यंत दक्ष झाले आहेत. आज आपण जी काही कलाकृती करतो ती प्रेक्षकांसाठी करतो. त्यांची पावती मिळाल्याशिवाय काहीच काही. ते जेवढे दक्ष होतील तेवढेच कलाकृती बनवणारी माणसं आपले टूल्स बदलतील. आता काहीही करुन उपयोगाचं नाही कारण प्रेक्षक लगेच पकडतात. हा बदल प्रेक्षकांमध्ये आधी झाला नंतर आमच्यामध्ये बदल झाला. आधी प्रेक्षक सुधरले आणि प्रेक्षकांनी आम्हाला बदलवलं. तरीही चुका आजही घडतच आहेत, असं ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले.
आज एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील ठाकरे सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात बरेच बदल देखील नुकतेच झाले आहेत. देशाचा स्वातंत्र्यदिन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात देशासह राज्यात अनेक समस्या आहेत. राज्याचं बोलायचं झालं तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, MPSC अशा अनेक मुद्द्यांसह, पूर, कोरोना अशी संकटं अद्याप कायम आहेत. यामुळं अनेक कलाकारांसह मनोरंजन क्षेत्रातील लोकांवरही संकट आलं आहे. यासंदर्भात सचिन पिळगावकर यांच्याशी संवाद साधला.
सचिन पिळगावकर म्हणाले की, आज सिनेमा क्षेत्रात अनेक बदल झालेत. आज डिजिटल स्वरुप झालंय पण आधीसारखी मजा नाही. मात्र याचा अर्थ असा नाही नवीन गोष्टींना मी मानत नाही. मला आज 58 वर्ष या क्षेत्रात झाली आहेत. या काळात मी नवीन प्रयोग करत राहिलो. मी अजूनही शिकतो आहे, असंही पिळगावकर म्हणाले.
महेश कोठारेंचं योगदान मोठं
सचिन पिळगावकर म्हणाले की, मी शहरी होतो, त्यामुळं माझी विचार करण्याची पद्धतही शहरी होती. मग मी सिनेमे निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यात मी गावाकडून सिनेमे शहरात आणले. हा खूप मोठा बदल होता. माझ्यानंतर महेश कोठारेनं दिग्दर्शन केलं. त्यानं सुद्धा तिच शैली पुढं नेली. आमच्या दोघात एक प्रकारची स्पर्धा होती. आमच्या जितकी स्पर्धा होती तितकीच आमच्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा होती. महेश कोठारेंचं योगदान मोठं आहे. महाराष्ट्रात नवीन टेक्निक आणण्यामध्ये महेश कोठारेंचं योगदान मोठं आहे. त्यांनी अतिशय सुंदर पावलं उचलली, असं पिळगावकर म्हणाले.
कोल्हापूरचं नाव कलापूर व्हायला हवं
सचिन पिळगावकर म्हणाले की, कोल्हापूर हे त्या जागेचं नाव कधीच नव्हतं. तिथं चित्रपटसृष्टी होती. तिथं कलावंत होते. सर्व प्रकारचे कलाकार तिथं असायचे. त्यामुळं त्या जागेचं नाव कलापूर होतं. इंग्रजांनी त्या नावाला वेगळ्या पद्धतीनं उच्चारत कोल्हापूर केलं. जसं मुंबईला एवढं नाव चांगलं असताना बॉम्बे केलं. माझी इच्छा आहे की पुन्हा एकदा कोल्हापूरचं नाव कलापूर व्हायला हवं. आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणार, असं सचिन पिळगावकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)