Loksabha Election 2024 : BJP लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर, 24 तासांच्या आत एका उमेदवाराने का घेतली माघार?
Loksabha Election 2024 BJP Candidate List : भाजपचे पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातील उमेदवार पवन सिंह यांनी माघार घेण्याची घोषणा केली आहे.
Loksabha Election 2024 BJP Candidate List : लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) साठी भाजपने 2 मार्च 2024 रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपच्या पहिल्या यादीत कोणकोणत्या उमेदवारांची नावे असणार याविषयीची उत्सुकता देशभरात होती. भाजपच्या यादीत पश्चिम बंगलामधील आसनसोल मतदारसंघातून भोजपुरी गायक पवन सिंह (Pawan Singh) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. यादी जाहीर झाल्यापासून चोवीस तासांच्या आत पवन सिंह यांनी उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी भाजपच्या मुख्यालयात लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपच्या यादीत पश्चिम बंगलामधून 20 मतदारसंघाचा समावेश करण्यात आला होता. भाजपच्या दृष्टीने हे 20 मतदारसंघ बंगालमधील अवघड मतदारसंघांपैकी आहेत. त्यात आसनसोल या मतदारसंघात बिहारी, उत्तर भारतीय मतदार महत्वाची भूमिका बजावतात. सध्या आसनसोल मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांना टक्कर देण्यासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक पवन सिंह यांना रिंगणात उतरवण्याचा डाव भाजपने खेळला होता. परंतु चोवीस तासांच्या आत तृणमूल काँग्रेसने हा डाव भाजपावर फिरवला आणि पवन सिंह यांना लढाई आधीच तलवार म्यान करावी लागली.
भारतीय जनता पार्टी के शीर्ष नेतृत्व को दिल से आभार प्रकट करता हु।
— Pawan Singh (@PawanSingh909) March 3, 2024
पार्टी ने मुझ पर विश्वास करके आसनसोल का उम्मीदवार घोषित किया लेकिन किसी कारण वश में आसनसोल से चुनाव नहीं लड़ पाऊंगा…@JPNadda
कोण आहेत पवन सिंह?
पवन सिंह यांनी अनेक भोजपुरी गाणी गायली आहेत. त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये पश्चिम बंगाल मधील महिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली आहेत. बंगाली महिला असा उल्लेख करून आक्षेपार्ह शब्द, भाषा पवन सिंह यांच्या गाण्यांमध्ये आढळते. पवन सिंह यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगोलग तृणमूल काँग्रेसने पवन सिंह यांच्या गाण्यांची पोस्टर्स तसेच क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केली.
संदेशखली मध्ये घडलेल्या महिला अत्याचार प्रकरणावरून तृणमूलला घेरणाऱ्या भाजपचे पवन सिंह मुळे मोठे नुकसान झाले असते. पवन सिंह यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या रात्रीच ही बाब पश्चिम बंगाल भाजप पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर घातली. भाजपच्या पद्धतीप्रमाणे पवन सिंह यांना आपण माघार घेत आहोत हे जाहीर करायला सांगण्यात आले. पवन सिंह यांनी X पोस्ट करून ते जाहीर करून सुद्धा टाकले. तरीही बंगाली अस्मितेचे राजकारण यशस्वीपणे करणाऱ्या तृणमूल काँग्रेसला एक मुद्दा रणधुमाळीपूर्वीच भाजपविरोधात मिळाला आहे. तो किती परिणामकारक ठरतो ते निवडणुकीचा रंग चढला की, आगामी काळात कळेलच.