भावनांचं रोलरकोस्टर, खुसखुशीत संवादाची फोडणी! "लास्ट स्टॉप खांदा'तून उलगडणार प्रेमाचा इमोशनल कॉमेडी ड्रामा, ट्रेलर पाहिलात का?
Last Stop Khanda:सध्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर गाजत असून, प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

Last Stop Khanda Marathi Movie: सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे. उत्तम लेखन, अभिनय, संगीत असलेला, पुरेपूर मनोरंजन करणारा हा चित्रपट 21 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून, चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
प्रेम... त्यातली गुंतागुंत, गोडवा आणि हलकीफुलकी मजा हे सगळं अनुभवायला मिळणार आहे ‘लास्ट स्टॉप खांदा’ या आगामी मराठी चित्रपटातून. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर गाजत असून, प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रेमाच्या गोष्टीचा वेगळा प्रवास
“प्रत्येकाचं प्रेम हे वेगळं असतं” या भावनेला अधोरेखित करणारी ही कथा आहे एका तरुणाची, ज्याचं बालपणापासून एका मुलीवर प्रेम असतं. मात्र काळ पुढे सरकतो, परिस्थिती बदलते आणि ते प्रेम अपूर्ण राहतं. पण एका दिवसात तिचं ब्रेकअप झाल्यावर तोच तरुण पुन्हा तिच्या आयुष्यात परतण्याचा प्रयत्न करतो. त्याचं हे प्रयत्न यशस्वी होतात का? याचं उत्तर प्रेक्षकांना ‘लास्ट स्टॉप खांदा’ मध्ये मिळणार आहे.
तगडी स्टारकास्ट आणि उत्कृष्ट सादरीकरण
या चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर आणि अभिनेत्री जुईली टेमकर प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. त्यांच्यासोबत निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, प्रियांका हांडे, निशांत जाधव आणि जयश्री गोविंद अशा दमदार कलाकारांची फळी आहे. तसेच पाहुण्या कलाकारांमध्ये धनश्री काडगावकर, प्रभाकर मोरे आणि अशोक ढगे यांच्या झळकण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
चित्रपटाचं लेखन श्रमेश बेटकर यांनी केलं असून, दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केलं आहे. निर्मिती प्रदीप मनोहर जाधव यांची असून सहनिर्मिती सचिन कदम आणि अमृता सचिन जाधव यांनी केली आहे. छायांकन हरेश सावंत यांचं असून, संगीत श्रेयस राज आंगणे यांचं आहे. तर नृत्यदिग्दर्शन राहुल बनसोडे आणि रवी आखाडे यांनी केलं आहे.
मनोरंजनाचा फुल पॅकेज!
‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणं आणि टायटल ट्रॅक आधीच लोकप्रिय झाले असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता दुपटीने वाढली आहे. ट्रेलरमधून हलकीफुलकी कथा, खुसखुशीत संवाद आणि नात्यांमधली गोडी दिसून येते. चित्रपटाच्या ट्रेलरमधून हलकीफुलकी कथा, खुसखुशीत संवादाची फोडणी असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे आता या चित्रपटाविषयीची उत्कंठा निर्माण झाली आहे. हा चित्रपट 21 नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
























