बाकावरच्या गप्पा, दप्तरातलं जग पुन्हा जिवंत होणार, क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम चित्रपटाचा भन्नाट टीझर प्रदर्शित
हेमंत ढोमे दिग्दर्शित हा चित्रपट नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात ठरणार एवढं मात्र नक्की. चित्रपटाचा टीजर पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Krantijyoti Vidyalay Marathi Movie: शाळेच्या घंटानादात दडलेल्या आठवणी, बाकावरच्या गप्पा, दप्तरातलं जग आणि जगणं घडवणाऱ्या त्या मराठी शाळा… अगदी हाच भाव गुंतवणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’सिनेमाचा भन्नाट टीझर प्रदर्शित झाला आहे. मराठी शाळांच्या अस्तित्वाला लागलेलं ग्रहण आणि त्या शाळांना पुन्हा जिवंतपण देणारी विद्यार्थ्यांची एकत्र येणारी फौज या भावनिक आणि तितक्याच मजेशीर सफरीची झलक पाहताच प्रेक्षकांच्या शाळेच्या आठवणी क्षणात जाग्या झाल्या आहेत. हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित हा चित्रपट नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात ठरणार एवढं मात्र नक्की. चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. (Marathi Movie)
काय आहे टीझरमध्ये ?
टीझरमध्ये दिसतेय की, मराठी शाळा बंद होण्याच्या संकटात सापडली असताना, जुने विद्यार्थी अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन शाळेला भेट देतात. या भेटीनंतर सुरू होते ती, त्यांच्या शाळेतील आठवणींची, नात्यांची आणि शाळेप्रती असलेल्या प्रेमाची नवी सफर. दिग्दर्शक हेमंत ढोमे यावेळेस प्रेक्षकांना आपल्या शालेय जीवनाची सफर घडवणार आहे. यात मराठी कलाकारांची दमदार फौज झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर या चित्रपटात मुख्यध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या कलाकारांसोबतच मराठी चित्रपटात पहिल्यांदाच प्राजक्ता कोळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “ शाळा हा आपल्या आयुष्याचा पाया असतो. आपण घडतो ते शाळेतच. पहिली भिती, पहिला राग, पहिली मेत्री, पहिलं प्रेम हे सारंकाही आपण शाळेतच अनुभवतो. त्यामुळेच मराठी शाळेचं हे भावविश्व रंगवताना प्रेक्षकांना त्यांच्या शाळेतल्या आठवणी अनुभवायला मिळतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे प्रेक्षकांचं मनोरंजन करत मराठी शाळांचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न मी केला आहे मला खात्री आहे प्रेक्षकांना आपली शाळा आठवणार आणि मराठी शाळा पुन्हा भरणार.”
येत्या नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून ही मराठी शाळा चित्रपटगृहात भरणार आहे. क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित, ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचे सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्मस्) आणि अजिंक्य ढमाळ हे आहेत. या सर्वांनी मिळूनच झिम्मा आणि झिम्मा 2 या चित्रपटांची निर्मिती केली होती.
























