25 फेब्रवारीला कोणतीही लेखी तक्रार आली नव्हती, सुशांतच्या वडिलांच्या दाव्यावर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
सुशांतच्या जीवाला धोका असल्याची माहिती मी फेब्रुवारीमध्येच मुंबई पोलिसांना दिली होती. मात्र मुंबई पोलिसांनी कारवाई केली नाही, असा दावा सुशांतचे वडील केके सिंह यांनी केला आहे. त्यावर अशी कोणतीही लेखी तक्रार वांद्रे पोलिसात दाखल झाली नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलं आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दरदिवशी नवीन ट्विस्ट येत आहेत, नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच मुंबई आणि बिहार पोलिसांच्या तसापावरुनही मतभेद निर्माण झाले आहेत. या प्रकरणात सातत्याने सीबीआय तपासाचीही मागणी होत आहे. सुशांतच्या जीवाला धोका असल्याची माहिती मी फेब्रुवारीमध्येच मुंबई पोलिसांना दिली होती. मात्र मुंबई पोलिसांनी कारवाई केली नाही, असा दावा सुशांतचे वडील केके सिंह यांनी केला आहे.
काय म्हणाले सुशांतचे वडील?
"सुशांतच्या जीवाला धोका असल्याची माहिती मी फेब्रुवारीमध्येच मुंबई पोलिसांना दिली होती. 14 जूनला सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली. त्यानंतरही पोलिसांनी कारवाई केली नाही. मी त्यांना सुशांतच्या आत्महत्येनंतरही सांगितले की, 25 फेब्रुवारीच्या तक्रारीत ज्यांची नावं आहेत त्यांच्यावर कारवाई करा. मात्र वांद्रे पोलिसांनी काहीही केलं नाही, त्यामुळे सुशांतच्या मृत्यूनंतर मी पाटणा या ठिकाणी तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला," असं सुशांत सिंह राजपूतचे वडील के के सिंह म्हणाले.
के के सिंह यांच्या दाव्यानंतर मुंबई पोलिसांनी पत्रक जारी करुन स्पष्टीकरण दिलं आहे. अशाप्रकारची कोणतीही लेखी तक्रार वांद्रे पोलिसात दाखल झाली नसल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
काय लिहिलंय मुंबई पोलिसांच्या पत्रकात?
14 जून सुशांत सिंह राजपूतच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वांद्रे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आज सुशांत सिंह राजपूत यांचे वडील के के सिंह यांनी वक्तव्य जारी करुन म्हटलं की कुटुंबाने 25 फेब्रुवारी रोजी वांद्रे पोलिसात लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र आम्ही स्पष्ट करु इच्छितो की, अशाप्रकारची कोणतीही लेखी तक्रार वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये त्या दिवशी दाखल झालेली नाही.
मात्र, सुशांत सिंह राजपूतचे मेहुणे ओ पी सिंह (आयपीएस) यांनी यासंदर्भात झोन 9 च्या डीसीपींना काही व्हॉट्सअॅप मेसेज केले होते. त्यानंतर झोन 9च्या डीसीपींनी ओ पी सिंह यांना कॉल करुन कोणत्याही कारवाई किंवा चौकशीसाठी लेखी तक्रार अनिवार्य असल्याचं सांगितलं. परंतु हे प्रकरण अनौपचारिकरित्या सोडवावं, अशी ओ पी सिंह यांची इच्छा होती. मात्र त्यावेळी झोन 9 च्या डीसीपींनी हे शक्य नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं.
शहाजी उमाप, डीसीपी ऑपरेशन्स
दरम्यान सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता पाटणा पोलीस विरुद्ध मुंबई पोलिसांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर याला आता हळूहळू नितीश कुमारांचं बिहार सरकारविरुद्ध ठाकरेंचं महाराष्ट्र सरकार असा रंग येऊ लागला आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी पाटण्याहून आलेले आयपीएस अधिकारी, विनय तिवारींना मुंबई महापालिकेने क्वॉरन्टाईन केलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विनय तिवारींसोबत जे झालं ते योग्य नाही असं नितीश कुमार म्हणाले. तर नितीश कुमार सरकारमधले मंत्री संजय झा यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
संबंधित बातम्या :
- Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतने मित्राला आत्महत्येपासून केलं होतं परावृत्त!
- Exclusive | सुशांतच्या नोकराचा धक्कादायक खुलासा; रिया घर सोडताना अशी होती सुशांतची रिअॅक्शन
- सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी निषेधार्ह : गृहमंत्री अनिल देशमुख
- पुजेसाठी सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये खर्च; बँक खात्याच्या स्टेटमेंटमधून धक्कादायक खुलासा
- Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या केसमध्ये घडतंय काय?