Kiran Mane : 'नेहरूजी वेडे होते, NSD ऐवजी मंदिरं बांधत बसले असते तरी चाललं असतं'; किरण मानेंची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट
Kiran Mane : किरण माने यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर लिहिलेली एक पोस्ट सध्या बरीच गाजतेय. दरम्यान यामध्ये त्यांनी एक किस्सा सांगितला आहे.
Kiran Mane : स्वतंत्र भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांची प्राणज्योत आजच्याच म्हणजे 27 मे रोजी मालवली. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांचं योगदान हे अवघ्या देशाला ज्ञात आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांनी जवळपास 16 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलं. 27 मे 1964 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त किरण माने (Kiran Mane) यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे खरंतर प्रत्येक कलाकारासाठी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेने आतापर्यंत भारतातील अनेक कलाकार घडवले आहेत. त्याचा पाया देखील पंडित जवाहरलाल नेहरु यांनीच रचला. त्यावरुन किरण माने यांनी एक किस्सा शेअर केला आहे. त्याच संदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
किरण माने यांनी काय म्हटलं?
किरण माने यांनी त्यांच्या फेसबुकवर ही पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं की, 'या नेहरूंनी तर देशाची वाट लावली." शुटिंगमधल्या ब्रेकमध्ये एक सहकलाकार तावातावात मला सांगत होता.मी विषय बदलत म्हणालो,"ते जाऊदे रे. पण मला तुझा अभिमान वाटतो यार. मुंबईत आल्याआल्या तुला सहजरीत्या सिनेमा-सिरीयलमध्ये काम मिळायला लागलं. हिंदीमध्येही फारसा स्ट्रगल न करता प्रवेश झाला लगेच कसं शक्य झालं रे?" तो खुप खुप अभिमानानं छाती फुगवत म्हणाला, "मी आज जो काही आहे ते एन.एस.डी. मुळे आहे. एन.एस.डी. नसती तर आज हजारो स्ट्रगलर्ससारखा धक्के खात असतो... किंवा गांवाकडे एमआयडीसीत नोकरी करत असतो. भारतभरातनं आलेले माझ्यासारखे खुप गरीब पण प्रतिभावान अभिनेते आज भारतीय सिनेमाक्षेत्रात नांव कमवू शकले ते केवळ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामुळेच.'
पुढे त्यांनी म्हटलं की, 'क्षणभर मी त्याच्याकडे एकटक बघत राहिलो. म्हटलं, "आता मुळ मुद्यावर येऊया? खरंच पंडित नेहरूंनी झक मारली यार. कृतघ्न अभिनेत्यांच्या पैदाशीला अभिनय प्रशिक्षित केलं, तगवलं, शिकवलं, उभं केलं. नेहरूंना अक्कल नव्हती. एकतर स्वातंत्र्यानंतरचा काळ. या गरीब देशात 'मूलभूत शिक्षणा'चाच अभाव होता ! अशावेळी नेहरूंनी रस्ते - वीज - पाणी आणि शिक्षण या सुविधांवर भर दिलाच.. पण त्याचबरोबर 'नाटक' हा कलाप्रकार बहरून, भारतात जगाला प्रभावीत करणारे कलावंत निर्माण व्हावेत म्हणून नेहरूंनी 'संगीत नाटक अकादमी' स्थापन केली. इब्राहीम अल्काझींसारखा हिरा पारखून, त्याला नाट्यप्रशिक्षणाचा अभ्यासक्रम आणि आखणी करण्याची सगळी जबाबदारी नेहरूंनी दिली. एन.ए.डी.चा पाया घातला. वेडे होते नेहरूजी. याऐवजी मंदिरं बांधत बसले असते तरी चाललं असतं. तुमच्यासारख्या नमकहरामांना त्या मंदिरापुढे भिक मागायला लागल्यावर स्वत:ची औकात तरी कळली असती." त्याने मान खाली घालून मोबाईलशी चाळा करत हळूच तिथून कल्टी मारली...'