Kiran Mane : ईडीला घाबरून सत्ताधार्यांच्या वळचणीला गेलेल्या भेकडांनो...; काँग्रेस नेत्याच्या कौतुकासाठी किरण मानेंची पोस्ट
Kiran Mane Social Media Post On D K Shivakumar : काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना दिलासा देताना ईडीने दाखल केलेले खटले रद्द केले आहेत. अभिनेता किरण माने याने डी.के. शिवकुमार यांचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे.
![Kiran Mane : ईडीला घाबरून सत्ताधार्यांच्या वळचणीला गेलेल्या भेकडांनो...; काँग्रेस नेत्याच्या कौतुकासाठी किरण मानेंची पोस्ट Kiran Mane Marathi actor and shiv sena ubt leader wrote Social Media Post On D K Shivakumar after supreme court dismissed money laundering case and ED and given relief Kiran Mane : ईडीला घाबरून सत्ताधार्यांच्या वळचणीला गेलेल्या भेकडांनो...; काँग्रेस नेत्याच्या कौतुकासाठी किरण मानेंची पोस्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/3e0bb791afa553227ee396ddb4d3d2001709798444150290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kiran Mane Social Media Post On D K Shivakumar : तपास यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी विरोधी पक्षातील अनेकजण सत्ताधारी पक्षात सहभागी होत असल्याचा आरोप, दावे केले जातात. पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर या नेत्याने आता भाजपात प्रवेश केल्याचे समोर आले. तर, दुसरीकडे काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना दिलासा देताना ईडीने दाखल केलेले खटले रद्द केले आहेत. अभिनेता किरण माने (Kiran Mane) याने डी.के. शिवकुमार यांचे कौतुक केले आहे.
सात वर्षांपूर्वी कर्नाटकमधील काँग्रेसचे दिग्गज नेते डी.के. शिवकुमार यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. आयकर विभाग, ईडी या सारख्या यंत्रणांचा ससेमिरा शिवकुमार यांच्या मागे लागला होता. ईडीने त्यांना अटकही केली होती. काही महिन्यांच्या तुरुंगवासानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांना शिवकुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर कोर्टाने शिवकुमार यांना दिलासा देताना गुन्हे रद्द केले.
किरण माने यांनी पोस्टमध्ये काय म्हटले?
अभिनेता किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये डी. के. शिवकुमार यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. तपास यंत्रणांना शरण जाणाऱ्या नेत्यांवर किरण माने यांच्यावर टीका केली.
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ईडीचा सापळा फाडून वाघ सुटला ! खरा जिगरबाज. बघा रे, ईडीला घाबरून सत्ताधार्यांच्या वळचणीला गेलेल्या भेकडांनो... तुमच्यावर पुढच्या पिढ्या कुत्सितपणे हसणार आहेत... पण या डी.के. शिवकुमार सारख्या सच्चा लढवय्याला डोक्यावर घेऊन नाचणार आहेत. मेंदूत कोरून ठेवा. त्रास सहन करून स्वत्व टिकवणार्या स्वाभिमानी योद्ध्यांची नांवं इतिहास सुवर्णाक्षरात कोरतो. लाचारी पत्करून तात्पुरती पदं मिळवणार्या भेकडांना उकीरड्यावर फेकून देतो, असे किरण माने यांनी म्हटले.
पुढे माने यांनी म्हटले की, काँग्रेस पक्षाचा कर्नाटकातला हा खंदा वीर... द रियल हिरो डी.के.शिवकुमार ! माजी उर्जामंत्री. ईडीची चौकशी झेलली छाताडावर. सत्ताधार्यांना भिक घातली नाही. मनी लाँड्रिंगच्या केसेस झाल्या. बदनामी झाली. पन्नास दिवस तुरूंगवास सोसला. सहा वर्ष झुंज दिली... आणि काल सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या केसेस 'बोगस' असल्याचे सांगत डी. के. शिवकुमार यांची निर्दोष मुक्तता केली !
डी.के.यांनी इतर कणाहीन नेत्यांप्रमाणे शेपूट घालून सत्तेत प्रवेश केला असता तर मुख्यमंत्रीही झाले असते. पण जनतेत छी थ्थू झाली असती. लोकांच्या नजरेतून कायमचे उतरले असते. पद आणि खोकी येतात तशी जातातही. पण 'इज्जत' आणि 'बाणेदारपणा' हजारो वर्ष तुमचं नांव टिकवतो!असे किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
डी.के., खरंतर तुमची हत्तीवरुन मिरवणूक काढावीशी वाटतीये. तुमच्या संघर्षाला लवून मुजरा घालावासा वाटतोय. पण एक लक्षात ठेवा, बदनामीचे घाव झेलूनही वर्चस्ववाद्यांपुढे न झुकलेल्या महामानवांना या देशाने कायम मनामेंदूत कोरून ठेवले आहे. आम्हाला त्यासाठी खोटे सिनेमे काढून कुणाची खोटी भलावण करायची गरज नाही. सुर्याला त्याच्या प्रकाशाची जाहिरात नाही करावी लागत. तुम्हाला तुमचा मान आणि आदर पुर्वीपेक्षा हजारपटींनी परत मिळणार. तुमच्या नावात 'शिव' आहे. बहुजनांचा आद्य महानायक !
दरम्यान, किरण माने हे आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असतात. सामाजिक-राजकीय घडामोडींवर किरण माने सातत्याने पोस्ट लिहित असतात. काही वेळेस माने यांना संघटीत ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)