(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kangana Ranaut in Lok Sabha Election : 'भारतातील जनतेचा स्वत:चा पक्ष...', तिकीट मिळाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, जन्मभूमीतूनच उमेदवारी दिल्यानं पक्षाचे मानले आभार
Kangana Ranaut in Lok Sabha Election : लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंगना रानौतची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Kangana Ranaut in Lok Sabha Election : भाजपकडून (BJP) रविवार 24 मार्च रोजी लोकसभा उमेदवारांची (Lok Sabha Candidate) पाचवी यादी जाहीर झाली. या यादीमध्येही अनेक कलाकारांची वर्णी लागली आहे. कंगना रानौत (Kangana Ranaut), अरुण गोविल (Arun Govil) यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंगना रानौतची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कंगनाने इन्स्टाग्राम पोस्ट करत पक्षाचे आभार मानले आहेत.
कंगना रानौतला हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. कंगनाला तिच्या जन्मभूमीतूनच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी कंगना निवडणुकीच्या मनात जनेतची मनं जिंकणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
कंगानाने काय म्हटलं?
कंगनाने पोस्ट करत म्हटलं की, 'माझा प्रिय भारत देश आणि भारतातील जनतेचा स्वतःचा पक्ष भारतीय जनता पक्षाने मला नेहमीच बिनशर्त समर्थन दिलं आहे. पाठिंबा दिला आहे. आज भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला माझ्या जन्मस्थानावरून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मी मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या हायकमांडच्या निर्णयाचे स्वागत करते.'
मी योग्य कार्यकर्ता आणि विश्वासार्ह लोकसेवक होण्याचा प्रयत्न करेन - कंगना रानौत
दरम्यान यावेळी पक्षात अधिकृत प्रवेश केल्याचं देखील यावेळी कंगनाने म्हटलं आहे. तिने म्हटलं की, 'आज मी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला आहे. याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. मी योग्य कार्यकर्ता आणि विश्वासार्ह लोकसेवक होण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.'
कंगनाच्या उमेदवारीच्या चर्चा
काही महिन्यांपूर्वी कंगनाच्या वडिलांनी ती लोकसभा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यातच कंगनाच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तिच्या राजकारणातील एन्ट्रीवरही बरीच चर्चा केली जायची. तिने राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला लावलेली हजेरी देखील त्यामुळेच जास्त चर्चेचा विषय ठरली. पण आता पक्षाने तिला उमेदवारी देऊन या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळत आहे.
अरुण गोविल यांनाही लोकसभेची उमेदवारी
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रानौत हिला हिमाचल प्रदेशातून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. त्यातच छोट्या पडद्यावर गाजलेल्या रामायणात रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना देखील लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील मेरठ या मतदारसंघातून भाजपनं तिकीट दिलंय. त्यामुळे आता अरुण गोविल देखील भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं.