Jay Dudhane Arrest: 10 दिवसांपूर्वीच लग्न लागलं, ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणेला अटक; विमानतळावरून पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वीच जय दुधाणे त्याचा दीर्घकाळाच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकला होता

Jay Dudhane Arrest: ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सिझनमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता आणि मॉडेल जय दुधाणे सध्या मोठ्या वादात सापडला आहे. ठाणे पोलिसांनी जय दुधाणेला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले असून त्याच्यावर तब्बल पाच कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच जय दुधाणे त्याचा दीर्घकाळाच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकला होता. त्याचा फोटो व्हिडिओ वर प्रेक्षकांनी शुभेच्छांचा वर्षावही केला होता. पण आता जयला विमानतळावरून ताब्यात घेतल्याने मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.
जय दुधाणेवर आरोप काय?
पोलिसांच्या माहितीनुसार, जय दुधाणेने बनावट कागदपत्रांचा वापर करत एकाच दुकानाची वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रकारातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी जयसोबतच त्याची आई, बहीण आणि आजी-आजोबा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
सध्या ठाणे पोलीस जय दुधाणेची कसून चौकशी करत असून या फसवणूक प्रकरणामागील नेमका कट, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, जय दुधाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वीच जयने आपल्या गर्लफ्रेंड आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटीलसोबत विवाह केला होता. 24 डिसेंबर 2025 रोजी ठाण्यात हा विवाहसोहळा पार पडला होता.
बिग बॉससह अनेक मराठी चित्रपटांमध्ये दिसला जय
जय दुधाणेने ‘स्प्लिट्सविला 13’ या रिअॅलिटी शोमधून पहिल्यांदा प्रसिद्धी मिळवली होती. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि उपविजेता ठरला होता. अभिनय क्षेत्रातही त्याने पाऊल टाकत काही मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गडद अंधार’सह ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातही तो झळकला होता.आता या फसवणूक प्रकरणामुळे जय दुधाणेच्या करिअरवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे
लक्ष लागले आहे.























