अभिनेत्री Ranya Rao च्या अडचणी वाढल्या, DRI ची मोठी कारवाई; 102 कोटींचा दंड ठोठावला
Gold Smuggling case : अभिनेत्री Ranya Rao च्या अडचणी वाढल्या, DRI ची मोठी कारवाई; 102 कोटींचा दंड ठोठावला

Gold Smuggling case : बेंगळुरूमध्ये सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगत असलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिच्यावर राजस्व गुप्तचर संचालनालयाने (DRI) तब्बल 102 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बेंगळुरू सेंट्रल तुरुंगात बंद असलेल्या रान्या राव यांना मंगळवारी DRI च्या अधिकाऱ्यांनी 2,500 पानांचे सविस्तर नोटीस पत्र दिले. हे प्रकरण 3 मार्च रोजी प्रसिद्धीझोतात आले होते, जेव्हा दुबईहून परतल्यावर बेंगळुरू विमानतळावर रान्या राव यांना अटक करण्यात आली.
तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यातून 14.8 किलो सोने जप्त करण्यात आले होते. लगेचच त्यांना अटकेत घेऊन तुरुंगात पाठवण्यात आले. या प्रकरणात केवळ रान्या रावच नव्हे, तर आणखी तीन आरोपींवरही कारवाई झाली असून त्यांच्यावर 50 कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. DRI च्या तपासात समोर आले की हे संपूर्ण नेटवर्क दुबई-बेंगळुरू मार्गावर अनेक वर्षांपासून सोन्याच्या तस्करीमध्ये सक्रिय होते.
रान्या राव – एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची सावत्र मुलगी
या प्रकरणात खळबळ उडाली, जेव्हा हे उघड झाले की रान्या राव या पोलीस महासंचालक (DGP) दर्जाच्या अधिकाऱ्यांपैकी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहेत. तपासात हेही निष्पन्न झाले की रान्या राव यांनी गेल्या एका वर्षात 30 वेळा दुबईला प्रवास केला, यापैकी 15 दिवसांच्या कालावधीत चार वेळा दुबई दौरा केला होता. असा संशय आहे की या प्रवासांदरम्यान त्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात सोने आणले.
तपासात कबुली, घरातूनही मोठी जप्ती
DRI च्या अधिकाऱ्यांच्या चौकशीत रान्या राव यांनी 17 सोन्याच्या सळ्या त्यांच्या ताब्यातून मिळाल्याची कबुली दिली. त्यांनी ही जप्ती मान्य करताना विनंती केली की त्यांच्या विरोधातील कारवाई जास्तीत जास्त खाजगी स्वरूपात ठेवावी. DRI च्या छापेमारीदरम्यान त्यांच्या घरी सुद्धा 2.06 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2.67 कोटी रुपये रोख सापडले.
COFEPOSA अंतर्गत शिक्षा आणि पुढील सुनावणी
जुलै महिन्यात, परदेशी मुद्रा संरक्षण आणि तस्करी प्रतिबंध अधिनियम (COFEPOSA) अंतर्गत रान्या राव यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने पुढील तारखेसाठी 11 सप्टेंबर निश्चित केली आहे. DRI च्या सूत्रांनुसार, ही एजन्सी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून सोन्याच्या तस्करीशी संबंधित संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी काम करत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























