Gautami Patil Apology : 'मी आता सुधारले तरी जुने व्हिडीओ लावून का बदनाम करता?', गौतमी पाटीलने पुन्हा मागितली माफी
Gautami Patil Apology : 'मी पूर्वी चुकले आणि त्यासाठी वारंवार माफी मागितली. आता ती चूक मी परत करणार नाही. आतातरी मला माफ करा, अशी विनंती लावणी क्वीन गौतमी पाटीलने केली आहे.
Gautami Patil Apology : 'मी पूर्वी चुकले आणि त्यासाठी वारंवार माफी मागितली. आता ती चूक मी परत करणार नाही. आतातरी मला माफ करा, अशी विनंती लावणी क्वीन गौतमी पाटीलने (Gautami Patil) केली आहे. आज मोडलिंब येथे एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ती असं म्हणाली आहे.
गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे एक समीकरण आहे. तिचा कोणताही कार्यक्रम वादाशिवाय पूर्ण होत नसल्याचे चित्र वारंवार समोर येत होते. यातच आता राजकीय पक्ष देखील तिच्यापासून लांब राहण्याची भूमिका घेऊ लागल्याने गौतमी पाटील हिच्या अडचणी वाढत होत्या. अश्लील हावभावामुळे तिने लावणीला बदनाम केल्याचे आरोप जेष्ठ लावणी कलावंत करू लागले होते. एवढे सर्व घडत असताना तिची लोकप्रियता मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली होती. यासर्व परिस्थितीवर गौतमी पाटील हिने एबीपी माझाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनमोकळी बातचीत करीत आपल्यावरील सर्व आरोप खोदून काढत आणि चुका कबूल करून माफी मागत वाद संपविण्याचे आवाहन केले आहे .
''मी पूर्वी चुकले, राती अर्ध्या राती हे गाणे करताना माझ्याकडून नक्की चुका झाल्या होत्या. पण आता मी त्या चुकांबद्दल माफी मागून पुन्हा तशी चूक करत नाही. तरीसुद्धा माझे जुने व्हिडीओ काढून मला टीकाकार वारंवार ट्रोल का करतात हेच मला समाजात नसल्याचे गौतमीने (Gautami Patil) सांगते .
आता मी पायात घुंघरू बांधते, साडी व्यवस्थित असते, कोणतेही चुकिचे हावभाव करीत नाही, असे असूनही मला ट्रोल का करतात हेच मला समजत नाही. माझ्या प्रसिद्धीमुळेच असे घडत असेल असे सांगताना तिने राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांनाही आपण आता सुधारली आहे, असे सांगत विनाकारण बदनाम केले जात असल्याचे तिने (Gautami Patil) सांगितले.
मीही शेतकऱ्याच्या घरातील मुलगी असून परिस्थितीमुळे मी या क्षेत्रात आले. सुरुवात लहान असताना अकलूज येथील लावणी महोत्सवात बॅक डान्सर म्हणून केली आणि त्यानंतर गेले 9 वर्षे सतत कार्यक्रम करीत असल्याचे गौतमी (Gautami Patil) सांगते. माझ्या टीकाकारांनाही मी विनंती करून त्यांची पुन्हा माफी मागते, असे सांगत माझे आताचे चांगले व्हिडीओ पाहा असे आवाहन देखील तिने केले. आता पोलीस विभागाच्या सहकार्यामुळे माझ्या कार्यक्रमात गोंधळ होत नाही. माझ्यावर प्रेक्षक आणि रसिक नितांत प्रेम करतात म्हणून माझ्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होते, यात माझी काय चूक, असे ती विचारते. सातत्याने माझे जुने व्हिडीओ लावून मला बदनाम करू नका, ट्रोल करू नका, असं ती म्हणाली आहे.
हे सर्व करताना आपले नवीन गाणे ऐकण्याची विनंती करीत तिचे मार्केटिंग देखील सुरु असले तरी तिच्या पूर्वीच्या रिल्स आणि व्हिडीओ मुळे ती जेवढी प्रसिद्ध झाली तेवढी बदनाम देखील झालीय. आता पुन्हा बदनामी पुसण्यासाठी सुधारल्याचे सांगणारी गौतमी (Gautami Patil) खरंच सुधारली आहे की, पुन्हा मूळ पदावर येणार, हे येणार काळ ठरवेल.