Entertainment News Live Updates 6 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jun 2022 09:04 PM
KK Last Song : 'धूप पानी बहने दे' केके यांचं शेवटचं गाणं रिलीज

Dhoop Paani Bahne De Song Out : गायक केके (KK) यांची अनेक गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच केके यांचं शेवटचं गाणं 'धूप पानी बहने दे' (Dhoop Paani Bahne De) हे नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'धूप पानी बहने दे' हे गाणं ऐकून चाहते भावूक झाले आहेत. 

टॉम क्रूझच्या 'Top Gun Maverick' सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई; जगभरात कमवला 4,284 कोटींचा गल्ला

टॉम क्रूझचा (Tom Cruise) 'टॉप गन मॅव्हरिक' (Top Gun Maverick) हा सिनेमा रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यातदेखील सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धमाका केला आहे. या सिनेमाने जगभरात आतापर्यंत 4 हजार 284 कोटींची कमाई केली आहे.

शिवराज्याभिषेक दिनी 'वीर मुरारबाजी ...पुरंदरची युद्धगाथा' सिनेमाची घोषणा; 17 फेब्रुवारीला सिनेमा होणार प्रदर्शित

शिवराज्याभिषेक दिनी 'वीर मुरारबाजी ...पुरंदरची युद्धगाथा' (Veer Murarbaji) या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हा सिनेमा 17 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

सलमान खान प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू : संजय पांडे

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खान प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांनी दिली आहे. दबंग खानच्या सुरक्षेतदेखील वाढ करण्यात आली आहे. 

धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याच्या अफवा : बॉबी देओल

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) सध्या चर्चेत आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याच्या अफवा सध्या पसरत आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. पण या सर्व चर्चांवर बॉबी देओलने (Bobby Deol) अखेर मौन सोडले आहे.

जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘फनरल’; 10 जून रोजी होणार रिलीज

असं म्हणतात... आयुष्यात दोनच दिवस महत्वाचे असतात आपण जन्मतो तो दिवस आणि ज्या दिवशी आपल्या जगण्याचा अर्थ कळतो तो दिवस ! जगण्याचा आनंद घेतला पाहिजे, आपल्या जवळच्या लोकांसोबत तो वाटूनही घेतला पाहिजे. अनेक लोक आपल्या आयुष्यातील अपूर्णता स्वीकारून आनंदाने जगत असतात. अगदी छोट्या, साध्या, नैसर्गिक गोष्टींमधे, अनुभवांमध्ये ही आनंदाच्या अनेक छटा लपलेल्या असतात. त्यांचा शोध घेणं, त्यातली गंमत अनुभवणं यातच आपल्या जगण्याचा सारा अर्थ सामावलेला असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'जगू आनंदे, निघू आनंदे' या टॅगलाईनसह जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’ प्रस्तुत 'फनरल' हा मराठी सिनेमा 10 जूनला चित्रपटगृहांत येत आहे.


वाचा सविस्तर बातमी 

'जुग जुग जिओ' सिनेमातील 'रंगीसारी' गाणं रिलीज

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan), कियारा आडवाणी (Kiara Advani), नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि अनिल कपूरच्या (Anil Kapoor) 'जुग जुग जिओ' (Jug Jugg Jeeyo) या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता सिनेमातील 'रंगसारी' (Rangisari) हे गाणं रिलीज झाले आहे. या गाण्यात वरुण धवन आणि कियारा आडवाणी रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. या गाण्याला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यश-नेहा अडकणार लग्नबंधनात; आजपासून सुरू होणार लग्न विशेष सप्ताह

 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. मालिकेच्या आगामी भागात यश-नेहाचा साखरपुडा होणार आहे. तर यश-नेहाचा शाही विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. 

पुन्हा एकदा होणार गौरीला ठार मारण्याचा प्रयत्न!

Sukh Mhanje Nakki Kay Asta : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत आता पुन्हा एकदा गौरीला जीवे मारण्याचा प्रयत्न होणार आहे. या आधी खोट्या जयदीप आणि मानसीने मिळून गौरीला एका डोंगरावरून ढकलून दिले होते. या जीवघेण्या हल्ल्यातून वाचलेली गौरी एका जंगलात जखमी होऊन पडते. यानंतर ती बरी होऊन पुन्हा एकदा शिर्के-पाटलांच्या घरात प्रवेश करते.


वाचा संपूर्ण बातमी

धमकीचं पत्र मिळाल्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, मुंबई पोलीस करणार तपासणी

Salman Khan Death Threat : महाराष्ट्राच्या गृह खात्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यावेळी काही पोलीस अधिकारी सलमान खानच्या घरी पोहोचले आहेत. 5 जून रोजी सलमान आणि सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते, त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.


 



‘विक्रम’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ‘सम्राट पृथ्वीराज’लाही टाकले मागे! पाहा किती गल्ला जमवला...

Vikram Vs Samrat Prithviraj: बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) स्टारर 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) 3 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तर, कमल हासनचा (Kamal Haasan) बहुचर्चित 'विक्रम' (Vikram) देखील याच दिवशी प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर पाहायला मिळाली आहे. प्रदर्शनापूर्वी अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाविषयी बरीच चर्चा निर्माण झाली होती. पण, तो प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे विशेष आकर्षित करू शकला नाही.


'सम्राट पृथ्वीराज'ने पहिल्या दिवशीच संथ सुरुवात केली होती. त्यानंतर वीकेंडमध्येही फारशी प्रगती दिसून आली नाही. तर, दुसरीकडे कमल हासनचा 'विक्रम'  तिकीट बारीवर धमाल करत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केलेली कमाई पुढे कायम ठेवली.


वाचा संपूर्ण बातमी

मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि  सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे

महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि  सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. काल सलीम खान यांना एक धमकीचे पत्र आले होते, ज्यात त्यांना आपण मुसेवाला यांचा उल्लेख होता. याप्रकरणी मुंबईचे वांद्रे पोलीस तपास करत आहेत.

'हर हर महादेव' चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नडमध्ये होणार प्रदर्शित

केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि जगात कुठेही असणाऱ्या मराठी माणसाला सतत प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या अखंड उर्जेला सतत प्रवाही ठेवणारी गोष्ट म्हणजे 'हर हर महादेव' ही शिवगर्जना! शिवाजी महाराजांचं कार्य त्यांची थोरवी याचं आकर्षण, कुतूहल आजही अनेकांच्या चर्चेचा, अभ्यासाचा विषय असतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर भारतीय भाषिकही महाराजांच्या कार्यावर संशोधन करतात. महाराजांचा हाच महिमा भव्य दिव्य स्वरूपात सर्वांसमोर येणार आहे 'हर हर महादेव' या चित्रपटातून. आणि हा महिमा सर्वदूर पोहचावा यासाठीच या चित्रपटाची निर्मिती संस्था असलेल्या झी स्टुडिओजने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 'हर हर महादेव' हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटांच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेली अशी ही घटना हर हर महादेवच्या निमित्ताने घडणार आहे. अभिजित देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाने सजलेला हा चित्रपट दिवाळीमध्ये सर्वांच्या भेटीस येणार आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

अंकिता लोखंडे-विकी जैनने जिंकला ‘स्मार्ट जोडी’ शो, पतीचं कौतुक करत अभिनेत्री म्हणते...

Ankita Lokhande, Vicky Jain : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांनी ‘स्टार प्लस’ रिअॅलिटी शोमध्ये ‘स्मार्ट जोडी’चा (Smart Jodi) किताब पटकावला आहे. या जोडीने अंतिम फेरीत बलराज-दीप्ती आणि नेहा स्वामी-अर्जुन बिजलानी यांचा पराभव करून या रिअॅलिटी शोची ट्रॉफी जिंकली. काल रात्री स्मार्ट जोडीचा महाअंतिम सोहळा स्टार प्लसवर ऑन एअर झाला. यानंतर आता अंकिता आणि विकिवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे.


अंकिता लोखंडेने रविवारी रात्री इंस्टाग्रामवर स्मार्ट जोडीच्या फिनालेची झलक शेअर केली आहे. यासोबतच तिने भरभरून प्रेम दिल्याबद्दल चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अंकिता लोखंडेने तिचा नवरा विकी जैन याच्यासाठी एक क्यूट मेसेजही लिहिला आहे. अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैनवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडिया असो किंवा कोणतेही प्लॅटफॉर्म, ती नेहमीच आपल्या पतीचे कौतुक करताना दिसते.


वाचा संपूर्ण बातमी

Kamal Haasan : '...म्हणून मी पाच वर्ष सिनेमापासून दूर होतो'; कमल हासन यांनी सांगितलं कारण

प्रसिद्ध अभिनेता कमल हासन (Kamal Haasa) यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. कमल हसन यांचा विक्रम हा चित्रपट काही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कमल हसन हे द कपिल शर्मा शोमध्ये उपस्थित राहिले होते. गेली पाच वर्ष सिनेमापासून दूर असलेल्या कमल हसन यांनी या शोमध्ये अनेक गोष्टींबाबत माहिती दिली. पाच वर्ष चित्रपटांपासून दूर असणाच्या कारण देखील यावेळी त्यांनी सांगितलं. 


वाचा सविस्तर बातमी 

बॉलिवूड पुन्हा कोरोनाच्या विळख्यात! शाहरुख ते कार्तिक आर्यनसह ‘या’ कलाकारांना झाली लागण

Bollywood Celebs Corona Positive : बॉलिवूड विश्व पुन्हा एकदा कोरोनाच्या (Corona) विळख्यात अडकले आहे. दिग्दर्शक-निर्माता करण जोहर (Karan Johar) याच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर अनेक बॉलिवूड कलाकार कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे. आता अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत त्याला लवकर बरे वाटावे म्हणून शुभेच्छा दिल्या, तेव्हा ही गोष्ट समोर आली.


मात्र, अद्याप मुंबई महानगर पालिका किंवा शाहरुख खान यांनी स्वतः या विषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. शाहरुखचा मुलगा अबराम याला देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात यशराज स्टुडिओच्या 'पठाण' चित्रपटाच्या मुंबईत सुरू असलेल्या शूटिंगदरम्यान सेटवर अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. अशा परिस्थितीत चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले होते.


वाचा संपूर्ण बातमी 

Sunil Dutt Birth Anniversary : बस कंडक्टर, अभिनेता ते राज्यसभा खासदार! सुनील दत्त यांनी ‘या’ क्षेत्रातही केलेय काम

Sunil Dutt Birth Anniversary : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त (Sunil Dutt) यांनी एक कलाकार म्हणून बॉलिवूड जगतात आपली अमिट छाप सोडली. यांचा जन्म 6 जून 1929 रोजी पंजाबमध्ये झाला होता. अभिनयासोबतच त्यांनी चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनातही हात आजमावला आणि सर्वच क्षेत्रात ते यशस्वी झाले. अभिनयच नव्हे, तर सुनील दत्त राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. ते मनमोहन सिंह सरकारमध्ये युवा आणि क्रीडा खात्याचे मंत्री होते. दोन वेळा खासदार बनले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी..


अभिनेते सुनील दत्त यांचा जन्म पंजाब राज्यातील झेलम जिल्ह्यातील खर्डी नावाच्या गावात झाला होता. त्यांचे खरे नाव बलराज दत्त होते. सुनील दत्त यांचे बालपण खूप संघर्षमय होते. सुनील दत्त अवघ्या 5 वर्षांचे असताना त्यांचे वडील दिवाण रघुनाथ दत्त यांचे निधन झाले. वडील गेल्यानंतर आई कुलवंती देवी यांनीच त्यांना लहानाचे मोठे केले. यानंतर सुनील दत्त उच्च शिक्षणासाठी मुंबईत आले. त्यांनी जय हिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने, त्यांनी मुंबई बेस्ट बसमध्ये कंडक्टरची नोकरी स्वीकारली.


वाचा संपूर्ण बातमी

Happy Birthday Neha Kakkar : कधीकाळी भजनं गाऊन केला उदरनिर्वाह, आता आपल्या आवाजाने बॉलिवूड गाजवतेय नेहा कक्कर!

Neha Kakkar Birthday : बॉलिवूड विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने मोठी उंची गाठली आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar). आज नेहा तिच्या सुरेल आवाजामुळे लोकांच्या हृदयावर राज्य करत प्रसिद्ध गायिका बनली आहे. मात्र, हा प्रवास तिच्यासाठी कधीच सोपा नव्हता. बालपणी ती आणि तिचे संपूर्ण कुटुंब जागरणामध्ये गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह करत होते. आज (6 जून) नेहा तिचा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी...


वयाच्या चौथ्या वर्षी केली गायला सुरुवात


नेहा कक्करने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीपासूनच तिचे वडील आणि भावासोबत जागरणसारख्या धार्मिक कार्यक्रमात काम करायला सुरुवात केली. नेहा आणि तिचे संपूर्ण कुटुंब यात भजनं गायचे. यानंतर नेहा 2004 दरम्यान भाऊ टोनी कक्करसोबत मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर तिचा गायिका होण्यासाठीचा संघर्ष सुरु झाला. वयाच्या 18व्या वर्षी, नेहाने इंडियन आयडॉलच्या दुसऱ्या सीझनसाठी ऑडिशन दिली होती, मात्र या शोमध्ये ती फार काळ टिकू शकली नाही.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; शाहरुख खानला कोरोनाची लागण


देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. बॉलिवूडमध्येदेखील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरची बर्थडे पार्टी कोरोना स्प्रेडर असल्याचे म्हटले जात आहे. आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला  कोरोनाची लागण झाली आहे. फिल्मफेअरने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.


करण जोहरची बर्थडे पार्टी कोविड स्प्रेडर? 50 ते 55 जणांना कोरोना संसर्ग


प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा काही दिवसांपूर्वी 50 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.  यशराज स्टुडिओमध्ये ही पार्टी पार पडली. पण करणच्या वाढदिवसाची ही पार्टी कोविडची सुपर स्प्रेडर पार्टी ठरत आहे का? असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे कारण या पार्टीत आलेल्या 50 ते 55 जणांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या पार्टीमध्ये उपस्थित होते. बॉलिवूडमधील कलाकार कोरोना संसर्ग लपवत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे.


मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘मिफ्फ-2022’ची सांगता


मुंबईत गेले सात दिवस सुरु असलेल्या ‘मिफ्फ-2022’ या माहितीपट,लघुपट आणि अॅनिमेशनपटांना समर्पित, सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन तसेच सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पद्मभूषण श्याम बेनेगल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई आणि फिल्म्स डिव्हिजनचे व मिफ्फचे संचालक रविंद्र भाकर देखील यावेळी उपस्थित होते.


कमल हासनच्या 'विक्रम'ने केली रेकॉर्डब्रेक कमाई


कमल हासनचा 'विक्रम' (Vikram) सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांतच या सिनेमाने जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने रिलीज आधीच 200 कोटींची टप्पा पार केला होता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.