मुंबई : मराठीमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा (Resigne) दिला होता. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या, तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्याने ते राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार का, अशीही चर्चा रंगली होती. शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांचे सासरे माजी मंत्री असून ते सध्या विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारही आहेत. त्यामुळे, शिवदीप लांडेंचा राजीनामा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांशी जोडला जात होता. मात्र, अखेर आयपीएस लांडेंचा राजीनामा स्वीकारण्यात न आल्याने त्यांना बिहार राज्यातच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आता, त्यांची बदली करण्यात आली असून त्यांना पोलीस महानिरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. बिहार राज्यातील पाटणा पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान राहील, असे म्हटले होते. त्यांच्या एका वक्तव्याने राजकीय भुवया मात्र उंचावल्या गेल्या होत्या. त्यावेळी, एबीपी न्यूजने शिवदीप लांडे यांच्याशी फोनवर चर्चा केली असता त्यांनी उघडपणे काहीही सांगितले नाही. शिवदीप लांडे यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, मी सेवेतून राजीनामा दिला आहे, पण पुढे काय करायचे ते ठरवलं नाही. शिवदीप लांडे हे शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय श्रीगणेशाची सुद्धा चर्चा रंगली होती. मात्र, आता त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.  


शिवदीप लांडे यांनी गेल्या 2 आठवड्यांपूर्वी राजीनामा दिला, तेव्हा ते पूर्णिया रेंजचे आयजी म्हणून तैनात होते. विशेष म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीच त्यांची पूर्णिया रेंजचे आयजी म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती. याआधी ते तिरहुत रेंजचे आयजी होते. गुन्हेगारांविरुद्ध त्यांची नेहमीच कठोर भूमिका राहिली. लांडे हे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीआयजी म्हणून काम केले आहे. आता, त्यांच्याकडे बिहार राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार देण्यात आला आहे. बिहारच्या गृह विभागाने त्यांच्या बदलीचे पत्रही जारी केले आहे. 


राजीनाम्यानंतर काय म्हणाले होते शिवदीप लांडे? 


राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे यांनी म्हटले होते की, 'माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. सरकारी कर्मचारी असताना माझ्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान राहील. आता, ते बिहारमध्येच राहतील हे स्पष्ट झाले आहे.  


महाराष्ट्रातही बजावली सेवा


शिवदीप लांडे हे बिहार केडरचे आयपीएस अधिकारी असले तरी त्यांची नियुक्ती महाराष्ट्रातही झाली आहे. शिवदीप लांडे यांची बिहारमध्ये एसटीएफचे एसपी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांची बदली महाराष्ट्र केडरमध्ये करण्यात आली. बिहारला परत येईपर्यंत ते महाराष्ट्र एटीएसमध्ये डीआयजी पदापर्यंत पोहोचले होते. बिहारमध्ये प्रथम नक्षलग्रस्त मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे नियुक्ती करण्यात आली होती. ते एएसपी म्हणून रुजू झाले होते. जवळपास दोन वर्षे इथे पोस्टिंग होते. यानंतर ते पाटणा येथे सिटी एसपी म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या गुन्हेगारांविरुद्धच्या कारवाईची पाटण्यात खूप चर्चा झाली.


हेही वाचा


राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..