मुंबई : दहावीची परीक्षा म्हणजे बोर्ड परीक्षा, म्हणूनच शालेय जीवनात या परीक्षेची वेगळीच धास्ती विद्यार्थ्यांना असते. मात्र, करिअरच्या एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर शाळेतील 10 वी (SSC) आणि महाविद्यालयीन जीवनातील 12 वीच्या परीक्षांची चर्चा होते. त्यावेळी, 10 आणि 12 वीला किती गुण होते, मग या वेगळ्याच क्षेत्रात करिअर कसं निवडलं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली जातात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही एका मुलाखतीत दहावीच्या गुणपत्रिकेची माहिती दिली. अर्थातच आर्ट, कॉमर्स आणि सायन्स हे माझ्यासाठी नव्हतेच, असे म्हणत राज ठाकरेंनी 10 वीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांची टक्केवारी सांगितली. तसेच, त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना अभ्यास करण्याबाबत आपण का सांगू शकलो नाही, याचा मजेशीर किस्साही उलगडला. 


अमित ठाकरे यांच्या शालेय जीवनातील व अभ्यासासंदर्भातील विषयवार बोलताना राज ठाकरेंनी मजेशीर किस्सा सांगितला. ''मला एकदा शर्मिलाचा फोन आला, ताबडतोब वरती ये, मला काहीच कळेना. मी वरती गेलो, बाजूला अमित बसला होता, आजीच्या डोळ्यात पाणी, शर्मिला रडतेय, मी म्हटलं काय झालंय. तेव्हा त्या म्हणाल्या, त्याला सांग अभ्यास करत नाही, बघ किती मार्क पडले. मग राज ठाकरेंनी म्हटलं, अभ्यास कर हे मी कुठल्या तोंडाने त्याला बोलू,'' असे म्हणत राज ठाकरेंनी अमित ठाकरेंच्या मार्क कमी असण्यावरुनचा मजेशीर किस्सा शेअर केला आहे. 


दहावीला 42 टक्के


मी दहावीला असताना, बाळासाहेब, माझे आई-वडिल सगळे बसले होते आणि त्यांनी एवढच सांगितलं होतं की, तू फक्त पास हो. मला आत्तापर्यंत वाटत होतं की मला 37 टक्के मार्क पडले आहेत, पण मध्यंतरी माझ्या हातामध्ये 10 वीचं मार्कलिस्ट आलं, तेव्हा पाहिलं, 42 टक्के मार्क आहेत, साधेसुधे नाही ते... असे म्हणत राज ठाकरेंनी 10 वी बोर्डाच्या परीक्षेतील त्यांची गुणवत्ता सांगितली.  


व्यंगचित्रकार म्हणून करिअरची सुरुवात


घरात चित्रकारीता होतीच, उद्धव जे.जे. स्कुल ऑफ ऑर्ट्सला गेले होते. त्यामुळे, आर्ट, कॉमर्स आणि सायन्स हे काही माझ्यासाठी नाही, हे मला वाटत होतं. जर तिकडे गेलो असतो, तर मी आजसुद्धा फर्स्ट इयरलाच असलो असतो, असे म्हणत राज ठाकरेंनी करिअरमधील आवडीच्या विषयावर भाष्य केलं. मी 1983 साली 10 वी पास झालो, 1985 साली बाळासाहेबांनी ब्रश खाली ठेवला, मार्मिकला 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर. मी त्याअगोदरच व्यंगचित्र करायला लागलो होतो, पण 1985 पासून मार्मिकची सगळीच व्यंगचित्र मला करायला लागली. त्यामुळे, मी कॉलेज सोडून दिलं, आजही मी पदवीधर नाही, मला कधीही त्याची गरज भासली नाही. दरम्यान, मी कॉलेजमध्ये असताना अनेकदा वार्ड लिजिज स्टुडिओमध्ये जाऊन एनिमेटर व्हायचं होतं. पण, तेव्हा संपर्काचं काही साधनचं नव्हतं. म्हणून मी राजकीय व्यंगचित्रकला सुरू केल्याचं राज ठाकरेंनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं. 


हेही वाचा


Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं