Ajit Pawar : मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी अतिशय वेगवान झाल्या असून राजकीय पक्षांमध्ये आवक-जावक सुरू झाली आहे. सध्या आपल्याला महायुतीत तिकीट मिळणार नाही, अजित पवारांसोबत (Ajit Pawar) राष्ट्रवादीमध्ये राहिल्यास विधानसभेची उमेदवारी भेटणार नसल्याचे पाहून काही नेतेमंडळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करत आहेत. तर, महायुतीत संधी नसल्यास महाविकास आघाडीतून तुतारी फुंकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीतील नेत्यांकडून होत आहे. काही दिवसांपूर्वी इंदापुरात भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेतली. त्याच कार्यक्रमात फलटणमध्ये 14 ऑक्टोबरला मेळावा होत आहे, तिथून फोन आला होता, असे शरद पवारांनी सांगितले होते. त्यामुळे, आमदार रामराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता, या प्रश्नावर स्वत: अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय.
अजित पवारांसोबत असलेल्या राजराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सातारा अजित पवार यांचे सातारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवार यांच्यासोबत असलेले फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण देखील तुतारी हातात घेणार आहेत. 14 तारखेला फलटणमध्ये जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडणार आहे. महायुतीत आल्यानंतर देण्यात आलेली आश्वासनं पाळली न गेल्याने अजित पवार यांची निंबाळकर कुटुंबीयांकडून साथ सोडली जात असल्याची सुत्रांची माहिती आहे. आता, यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. ''रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत आमच बोलणं झालं आहे, अजून तरी वेगळा निर्णय त्यांनी घेतलेला नाही, असे म्हणत त्यांच्या शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील प्रवेशावर अजित पवारांनी परखडपणे भूमिका मांडली. त्यामुळे, रामराजे नाईक निंबाळकरांचा निर्णय काय झालाय, ते 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मेळाव्यातूनच स्पष्ट होईल, असेच दिसून येते. दरम्यान, आयाराम-गयाराम यांच्याबद्दल जे बोलत होते, तेच आता आयाराम गयारामांना पक्षात घेत आहेत, असे म्हणत नाव न घेता अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होत असलेल्या पक्षप्रवेशावर खोचक टोला लगावला.
रामराजेंनी घेतली अजित पवारांची भेट?
रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी महायुतीत होणारा अन्याय आणि त्रासाचा दाखला देत तुतारी हाती घेण्याची भूमिका मांडली होती. मात्र, संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. मात्र, आता या सर्वांचाच निर्णय पक्का झाल्याची माहिती आहे. दरम्यान, यासंदर्भात रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांशी चर्चा केली आहे. याबाबत अजित पवारांनीही माहिती दिली. त्यामुळे, पुढील काही दिवसांतच रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका स्पष्ट होईल.