Entertainment News Live Updates 19 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jun 2022 09:31 PM
Jaya Prada On Rajesh Khanna : राजेश खन्ना सेटवर नेहमी उशीरा यायचे; 'द कपिल शर्मा'शोमध्ये जया प्रदा म्हणाल्या...

जया प्रदा आणि राज बब्बर अशा सिनेसृष्टीतील दोन दिग्गजांनी नुकतीच कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात दोघांनीही त्यांच्या फिल्मी करिअरमधल्या अनेक गोष्टींना उजाळा दिला. या कार्यक्रमात कपिल शर्माने दोघांसोबत गप्पा मारल्या. त्यांना अनेक प्रश्न विचारले. दरम्यान कपिलने प्रश्न विचारला, सेटवर कोणते कलाकार उशीरा येतात. तेव्हा जया प्रदा यांनी राजेश खन्नाचे नाव घेतले. जया प्रदा पुढे म्हणाल्या,"सेटवर राजेश खन्ना खूप उशीरा यायचे. राजेश खन्नांना जर सकाळी सातची वेळ दिली असेल तर ते थेट रात्री आठ वाजता सेटवर यायचे आणि नऊ वाजता पॅकअपदेखील करायचे.

'झिम्मा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'झिम्मा' (Jhimma) सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे. 26 जूनला या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. 26 जूनला दुपारी एक वाजता प्रवाह पिक्चरवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. 

बॉक्स ऑफिसवर 'मेजर'चा धमाका; विकेंडला केली दुप्पट कमाई

'मेजर' (Major) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली होती. पण विकेंडला या सिनेमाने दुप्पट कमाई केली आहे. शुक्रवारी या सिनेमाने 27 लाखांची कमाई केली आहे. तर शनिवारी या सिनेमाने थेट 55 लाखांची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 11.51 कोटींची कमाई केली आहे. 

अनुष्का शर्माच्या 'चकदा एक्सप्रेस' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; झुलन गोस्वामींची भूमिका साकारणार

Anushka Sharma Shoot Begins Chakda Xpress : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनुष्काचा 'चकदा एक्सप्रेस' (Chakda Xpress) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्काने आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अनुष्का  ‘झिरो’ सिनेमात शेवटची दिसली होती. अनुष्काने मुलीच्या जन्मानंतर काही वर्ष सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. पण 'चकदा एक्सप्रेस' या सिनेमाच्या माध्यमातून अनुष्का आता कमबॅक करणार आहे. 



'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनला होणार सुरुवात; प्रोमो आऊट

सिने निर्माता करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee with Karan) या कार्यक्रमाचा सातवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो करणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत. 





देशपांडे सरांसमोर येणार इंद्राची खरी ओळख; आज रंगणार एक तासाचा विशेष भाग

 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. इंद्रा-दीपूच्या प्रेमाचे सत्य अखेर देशपांडेसमोर येणार आहे. आज मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. या विशेष भागात इंद्रा राडा नाही तर तांडव घालताना दिसणार आहे.





‘सुजल द वोर्टेक्‍स’ सीरिज झाली रिलीज

Suzhal The Vortex : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता चित्रपटांबरोबरच दाक्षिणात्य वेब सीरिज देखील प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. नुकतीच  ‘सुजल द वोर्टेक्‍स’ (Suzhal The Vortex) ही तमिळ सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या सारिजचं बॉलिवूडमधील आणि टॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कौतुक केलं. या सीरिजमध्ये  कथिर, ऐश्‍वर्या राजेश, श्रिया रेड्डी आणि राधाकृष्णन पार्थिबनलीड या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

फिटनेस फ्रीक प्राजक्ताचा व्हिडीओ व्हायरल

Prajakta Mali : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. प्राजक्ता तिच्या फिटनेसकडे देखील विशेष लक्ष देते. प्राजक्ता वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करुन तिच्या चाहत्यांना फिटनेसच्या टिप्स देते. नुकताच एक खास व्हिडीओ प्राजक्तानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता ही 108 सूर्यनमस्कार घालताना  दिसत आहे. 


वाचा सविस्तर बातमी

लेकीसोबत अनुष्का शर्माची सायकल सफारी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नुकतीच मालदीवमधून भारतात परतली आहे. अभिनेत्री आपल्या संपूर्ण कुटुंबासह सुट्ट्यांचा आनंद लुटत होती. अनुष्का शर्माने मालदीवमध्ये पती विराट कोहली (Virat Kohli) आणि मुलगी वामिकासोबत (Vamika) खूप एन्जॉय केले आहे. अनुष्का मालदीवमधून घरी परतली आहे आणि सुट्टीत घालवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकताच अनुष्काने एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर लाईक्सचा पाऊस पडत आहे.


अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सायकलिंगचा आनंद लुटताना दिसत आहे. कधी नारंगी, कधी गुलाबी तर कधी पांढरी मोनोकिनी परिधान करून अनुष्का आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत आहे. विशेष म्हणजे अनुष्काच्या सायकल राईडमध्ये तिची मुलगी वामिकाही तिच्यासोबत दिसत आहे. अनुष्काने तिच्या सायकलच्या मागे बेबी सीट लावली आहे, ज्यामध्ये तिची मुलगी वामिका देखील बसली आहे. अर्थात व्हिडीओत वामिकाचा चेहरा दिसत नाही.


 



कार्तिक आर्यनचा सुपरहिट चित्रपट ‘भूल भुलैया 2’ ओटीटीवर रिलीज! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार...

Bhool Bhulaiyaa 2 On OTT: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 20 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू आजही बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. अजूनही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कमी होत नाहीये. या चित्रपटातील कार्तिक आर्यनच्या अभिनयाला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. कियारा अडवाणीसोबतची त्याची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना आवडली आहे.


दरम्यान, आता हा चित्रपट ओटीटीवरही आला आहे. 'भूल भुलैया 2' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या हा चित्रपट बघण्याची संधी मिळणार आहे.

काश्मिरी पंडित आणि मॉब लिंचिंगबाबतच्या वक्तव्यावर साई पल्लवीचं स्पष्टीकरण; म्हणाली..

Sai Pallavi : दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) ही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्याबाबत चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये साई पल्लवीनं काश्मिरी पंडितांबद्दल आणि मॉब लिंचिंगबाबत वक्तव्य केलं होतं. आता एका व्हिडीओच्या माध्यमातून साईनं तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 


पाहा व्हिडीओ:



'तारक मेहता' मधील नव्या दयाबाबत निर्माते म्हणाले, 'प्रेक्षकांनी समजून घ्यावं...'

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah :  ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावर प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेमध्ये दया ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानीच्या (Disha Vakani)  अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण गेल्या पाच वर्षांपासून दिशा ही या मालिकेमध्ये काम करत नाहीये. दया ही आता पुन्हा या शोमध्ये परतणार आहे, असं म्हटलं जात आहे. अभिनेत्री  राखी विजन ही दया ही भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे.  मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Modi) यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दया या भूमिकेबाबत सांगितलं. 


वाचा सविस्तर बातमी

‘कधीही न ऐकलेले वडिलांचे शब्द’, बोमन ईरानींनी शेअर केली भावस्पर्शी कविता!

Boman Irani : ज्येष्ठ अभिनेते बोमन ईरानी (Boman Irani) यांनी नुकतेच डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. सायकोलॉजिकल थ्रिलर वेब सीरिज ‘मासूम’मधून त्यांनी डिजिटल विश्वात पाऊल टाकले आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेते बोमन यांनी एका वडील-मुलीमधील गुंतागुंतीचे नाते दाखवले आहे. या सीरिजच्या आणि ‘फादर्स डे’च्या निमित्ताने त्यांनी एक पालक आणि मूल यांच्यातील आव्हानात्मक नाते दर्शवणारी एक हृदयस्पर्शी कविता शेअर केली आहे. या कवितेतून बोमन यांनी एक बाबा आपल्या मुलांचे सदैव रक्षण कसे करतो, याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.


या कवितेचे नाव आहे ‘अ फादर्स अनसेड वर्ड्स’. या भावस्पर्शी कवितेतून त्यांनी सगळ्याच चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांची ही कविता ऐकून अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले आहे.


वाचा संपूर्ण बातमी

मोठ्या पडद्यावर एक-दोन नव्हे तब्बल 150हून अधिक वेळा यमसदनी गेलेला लाडका खलनायक!

Ashish Vidyarthi Birthday : अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते आशीष विद्यार्थी (Ashish Vidyarthi ) आज (19 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. आशीष यांचा जन्म 19 जून 1962 रोजी केरळमधील कन्नूर येथे झाला.  आशीष यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यामुळे मोठं होऊन आपण अभिनेता बनायचं हे त्यांनी बालपणीच मनाशी पक्कं केलं होतं. आपल्या याच प्रवासाच्या दिशेने पुढे सरकण्यासाठी त्यांनी 1990मध्ये दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (NSD) प्रवेश घेतला आणि आपले अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले.


अभिनायचे शिक्षण घेत असताना आणि पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी दिल्लीत राहून अनेक नाटके केली. त्यानंतर ते नव्या संधीच्या शोधात 1992 दरम्यान मुंबईत आले. बॉलिवूड इंडस्ट्रीत त्यांनी आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली. इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुन्हा कधीच थांबला नाही.


वाचा संपूर्ण बातमी

कधी काळी बॅकग्राउंड डान्सर म्हणून केलं काम, आता साऊथसह बॉलिवूड गाजवतेय काजल अग्रवाल!

Kajal Aggarwal Birthday : साऊथपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आज (19 जून) आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात बॉलिवूड चित्रपटातून केली होती. मात्र, साऊथ इंडस्ट्रीने तिला खरी ओळख मिळवून दिली. साऊथमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर  अभिनेत्री काजळ अग्रवालने 2011मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आणि बॉलिवूडविश्वही गाजवले.


काजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985 रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीने मास मीडिया विषयामध्ये पदवी मिळवली आहे. काजलला बालपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. यामुळे तिने ‘बॅकग्राउंड डान्सर’ म्हणून करिअरला सुरुवात केली होती.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं कलम का लावलं?, महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कळवा पोलिसांकडे उत्तर मागितलं


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतळी चितळेला अटक करण्यात आली. तिच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66 (अ) लावल्यावरुन आता पोलीस अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणात कळवा पोलीस स्टेशनमधील जबाबदार अधिकाऱ्याने केतकी चितळेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66 (अ) का लावलं याचं उत्तर आणि अहवाल मागितला आहे.


सिद्धू मूसेवालाच्या गाण्याचा नवा विक्रम, ‘बिलबोर्ड 200’च्या यादीत ‘295’ला मिळाले मानाचे स्थान!


पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग देशातच नाही, तर परदेशातही आहे. आता सिद्धू मूसेवालांच्या '295' या गाण्‍याने जागतिक ‘बिलबोर्ड 200’च्‍या यादीमध्‍ये स्‍थान निर्माण केले आहे. मात्र, हे यश पाहायला सिद्धू आज आपल्यात नाहीत.  या विक्रमानंतर चाहते त्‍यांची आठवण करून भावूक होत आहेत आणि सोशल मीडियावर आपल्‍या प्रतिक्रिया देत आहेत. या आठवड्यात सिद्धू मूसेवाला यांचे ‘295’ हे गाणे जागतिक बिलबोर्ड यादीत 154व्या क्रमांकावर आहे.


अजिंक्य राऊत-शिवानी बावकरची जमली जोडी! ‘नाते नव्याने’ प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला


एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या एव्हरेस्ट म्युझिकने ‘नाते नव्याने’ हे ‘थोडे अलवारसे, थोडे हळुवारसे...’ या मुखडयाचे प्रेमगीत प्रदर्शित केले असून, एव्हरेस्ट म्युझिकच्या युट्युबवर या व्हिडीओला चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या गाण्यात टीव्ही विश्वातील प्रसिद्ध कलाकार अजिंक्य राऊत - शिवानी बावकरची जोडी जमली आहे.


'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भारती दबडेने केली आयुष्यातली पहिली कमाई; रंगला ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ!


'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. बदलापूरच्या भारती दबडे यांनी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर आयुष्यातली पहिली कमाई केली आहे. ज्ञानाच्या साथीनं सर्वकाही शक्य आहे हे त्यांनी त्यांच्या खेळातून प्रेक्षकांना दाखवून दिलं आहे.


सरसेनापतींचा हाऊसफुल्ल चौथ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश


प्रविण तरडेंचा 'सरसेनापती हंबीरराव' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना टक्कर दिली आहे. आता या सिनेमाने चौथ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅठफॉर्मवर प्रदर्शित होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.