परभणी : जगात जर्मनी अन् भारतात परभणी (Parbhani) अशी म्हण परभणीबाबत जगप्रसिद्ध आहे. मात्र, तुलना जर्मनीशी अन् प्रत्यक्ष परभणीचे एखाद्या खेड्यापेक्षा बेक्कार हाल झाले आहेत. शहरातील रस्ते केवळ नावालाच उरले असून खड्डे अन धुळीचे शहर अशी नवी परभणीची ओळख झालीय. 2011 साली नगर परिषदेची परभणी महानगरपालिका झाली,  त्यावेळी आता परभणीकरांना प्रश्न सुटतील असे वाटले. पण, प्रश्न तर सुटलेच नाहीत याउलट भरमसाठ कर माथी पडला. त्यामुळेच आता आपली नगर परिषदच बरी होती अशी म्हणण्याची वेळ परभणी करांवर आलीय. परभणी शहरात प्रवेश करण्यासाठी एकूण 4 प्रमुख रस्ते आहेत कुठूनही शहरात प्रवेश केला तर रस्त्यावरील खड्डे (pathole) अन उडणाऱ्या धुळीने स्वागत होते. शहरातील प्रमुख रस्ते असो व गल्लीबोळातील रस्ते शहरात रास्ता नावाची संकल्पनाच राहिली नाही. प्रचंड खड्डे पडले आणि यातूनच निर्माण होणाऱ्या धुळीची समस्याही मोठी आहे. कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारली तर अक्खा चेहरा धुळीने माखला जातो, अशी ओरड परभणीकरांची आहे. 


राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी शहरातील 6 रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केले, त्याचे भूमिपूजन केले. मात्र, सरकार बददले अन् ते स्थगितीत अडकले. पुन्हा सरकार बदलले 6 पैकी 3 रस्त्यांना निधी मिळाला, काम सुरु झाले. मात्र, हे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याने अगोदर रस्त्यासाठी अन् नंतर काम पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलन करावी लागत आहे. तसेच हे 3 रस्ते सोडले तर इतर रस्त्याची काम केंव्हा होणार असा प्रश्न सर्वसामान्य परभणीकरांना पडलाय.परभणी शहरातील जिंतूर रस्त्यांवरील वस्त्या असो,दर्गाह रास्ता असो,बाळासाहेब ठाकरे नगर असो अशा अनेक वस्त्यांमधील रस्ते असो कि स्मशान भूमी आणि रुग्णालयाकडे जाणारा रास्ता, प्रत्येक रस्ते मोठ्या मोठ्या खड्ड्यानी भरले आहेत. 


परभणी शहरात 16 वार्डात 65 प्रभाग आहेत. 70 ते 72 हजार मालमत्ता धारक, 22 हजार नळ कनेक्शन आहेत. मनपाला घरपट्टी,नळपट्टी,विविध कर,भाड्याने दिलेले संकुल,इतर इमारती असे मिळून महिन्याकाठी दीड ते 2 कोटी रुपये उत्पन्न मिळते त्यात 762 मनपा कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महिन्याकाठी एकूण चार कोटी रुपये लागतात. महिन्याचा मनपाचा एकुण खर्च हा 8 कोटी आहे. ज्यात शासन 2 कोटी देतं आणि त्यांचे स्वतःचे उत्पन्न 2 कोटी असे 4 कोटीं रुपये मनपाकडे असतात. दरमहा मनपाला 4 कोटी रुपये अतिरिक्त लागत आहेत. त्यामुळे एकीकडे परभणीकर करांचा भरणा करून बेजार आहेत, पण ना सुविधा मिळत आहेत ना कर्मचायांनाही वेळेत पगार मिळतोय. याच आर्थिक ओढाताणीत परभणी कर विकासापासून वंचित आहेत.  


पालकमंत्र्यांनी दिलं आश्वासन


परभणी शहरातील याच परिस्थतीबाबत आम्ही मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, ते वेळेचं देत नसल्याने त्यांची परभणीच्या रस्ते विकासाबाबत प्रतिक्रिया मिळाली नाही. पण, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीकरांना येत्या काळात सर्व प्रश्न सोडवले जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे, एकुणच येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून तरी परभणीतील रस्त्यांची अवस्था सुधारण्यावर नेत्यांनी अन् प्रशासकांनी भर द्यावा अन्यथा परभणीकरांच्या रोषाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झालीय हेही खरे.


हेही वाचा


लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका