Dada Kondke Birth Anniversary : गिरणी कामगाराच्या लेकाने अवघं मनोरंजन विश्व गाजवलं! वाचा दादा कोंडके यांच्याबद्दल...
Dada Kondke : मराठी मनोरंजन विश्वात अनेक विनोदी कलाकार होऊन गेले. पण, या विनोदी कलाकारांच्या यादीत नेहमीच अग्रक्रमी राहिले ते नाव म्हणजे दादा कोंडके!
Dada Kondke : मराठी मनोरंजन विश्वात अनेक विनोदी कलाकार होऊन गेले. पण, या विनोदी कलाकारांच्या यादीत नेहमीच अग्रक्रमी राहिले ते नाव म्हणजे दादा कोंडके (Dada Kondke). अभिनेते दादा कोंडके यांनी प्रेक्षकांना नुसतंच हसवलं नाही, तर त्यांचं भरपूर मनोरंजन देखील केलं. त्यांचे हावभाव, त्त्याची भाषा, पेहराव आणि चित्रपटांची हटके नावं यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. विषय कोणताही असो, तो आपल्याला हवा तसाच वळवायचा आणि तो समोरच्याला विनोदाच्या माध्यमातून अतिशय मार्मिक भाषेत पटवूनही द्यायचा, यात त्यांची हातोटी होती. केवळ अभिनयच नाही, तर त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही आपले नशीब आजमावले होते.
दादा कोंडके हे नाव केवळ मराठी मनोरंजन विश्वापुरतं मर्यादित नाही. त्यांनी आपल्या हटके शैलीने हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. प्रेक्षकांना नेमकं काय हवंय, हे दादांनी जाणलं होतं. त्यामुळेच त्यांचे सगळेच चित्रपट सुपरहिट ठरले. मनोरंजन विश्वातल्या लाडक्या अभिनेत्याची आज (8 ऑगस्ट) जयंती.
गिरणी कामगाराचा मुलगा ते लोकप्रिय अभिनेता!
दादा कोंडके यांचा जन्म गिरणी कामगारांचीभूमी म्हणजेच लालबागमध्ये झाला. त्यांचे वडील गिरिनी कामगार होते. 8 ऑगस्ट 1932, गोकुळाष्टमीच्या दिवशी घरात बाळाचे आगमन झाल्याने त्यांचे नाव ‘कृष्णा’ ठेवण्यात आले होते. कृष्णा लहानपणापासूनच खोडकर होता. हळूहळू त्याच्या या बाललीला वाढू लागल्या आणि सगळेच त्याला ‘दादा’ म्हणून लागले. पुढे त्यांचे हेच नाव प्रचलित झाले. दादांच्या मोठ्या भावाचे अचानक निधन झाल्याने संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. अशावेळी त्यांनी ‘अपना बाजार’मध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना दरमहा अवघा 60 रुपये पगार मिळत होता. याच दरम्यान त्यांनी सेवादलाच्या बँडमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
सेवादलात असतानाच त्यांची भेट निळू फुले, राम नगरकर यांच्याशी झाली. सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले. सेवादलातील कुरबुरींनंतर ‘खणखणपुरचा राजा’ मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादांनी स्वतःचा फड उभारला. यानंतर दादा कोंडके वसंत सबनिसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. हे नाटक खूप गाजले. या नाटकाच्या वेळी भालजी पेंढारकर यांनी दादा कोंडकेंना ’तांबडी माती’ या चित्रपटात कास्ट केले.
‘सोंगाड्या’ने थिएटर गाजवले!
‘तांबडी माती’नंतर दादा कोंडकेंचा ‘सोंगाड्या’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, ‘सोंगाड्या’ला स्क्रीन मिळत नव्हत्या. त्याकाळात बॉलिवूडच्या बड्या कलाकारांचे चित्रपट थिएटरमध्ये सुरु होते. अशावेळी, बाळासाहेब ठाकरे त्यांच्या मदतीला धावून आले. हिंदी चित्रपट उतरवून ‘सोंगाड्या’ला शो देण्यात आले आणि हा चित्रपट तुफान गाजला. यानंतर त्यांचे ‘एकटा जीव सदाशिव’, ‘आंधळा मारतो डोळा’ हे चित्रपट देखील सुपरहिट ठरले. 1975मध्ये दादा कोंडकेंनी त्यांच्या ‘पांडू हवालदार’ या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ यांना संधी दिली.
दादा कोंडके यांचे ‘राम राम गंगाराम’, ‘पळवा पळवी’, ‘पांडु हवालदार’, ‘आली अंगावर’, ‘मुका घ्या मुका’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘येऊ का घरात?’ , ‘सासरचे धोतर’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘गनिमी कावा’, ‘तांबडी माती’, ‘सोंगाडया’, ‘आंधळा मारतो डोळा’, ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’, ‘तेरे मेरे बीच में’, ‘खोल दे मेरी जुबान’, ‘आगे की सोच’, ‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’ हे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले. सगळेच चित्रपट जवळपास सुपरहिट देणाऱ्या दादा कोंडके यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नोंदवण्यात आले आहे.
हेही वाचा :