विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? अंबादास दानवेंची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, महाविकास आघाडीत...
Ambadas Danve : महाविकास आघाडीत संख्याबळानुसार विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी शिवसेना ठाकरे गट दावा करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यानंतर आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) शपथविधी सोहळा आज पडणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी आवश्यक संख्याबळ नाही. मात्र, विधानसभेत विरोधी पक्ष नेता असावा अशी मागणी महाविकास आघाडीकडून केली जात आहे. त्यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय.
निकोप लोकशाहीसाठी विधानसभेत विरोधी पक्षनेता अत्यंत आवश्यक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा असल्याचे मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. देशात अनेक ठिकाणी विरोधी पक्षाचे मोजकेच आमदार असताना विरोधी पक्ष नेते पद विरोधी पक्षांना देण्यात आले आहे. महाराष्ट्रातही यापूर्वी असेच घडले आहे. त्यामुळे महायुती सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा तसेच घडवेल, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे दानवे यांनी म्हटलंय. आता विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्ष नेत्याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अंबादास दानवेंची सावध प्रतिक्रिया
दरम्यान, महाविकास आघाडीत संख्याबळानुसार विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत विचारले असता अंबादास दानवे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीतून विरोधी पक्षनेता कोण होईल, कोणत्या पक्षाचा होईल या संदर्भात निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होईल. तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते यासंदर्भात मिळून निर्णय घेतील. तो निर्णय सर्वांना मान्य राहील, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी नियम काय?
विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या 10 टक्के आमदार असणं आवश्यक आहे
महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांची एकूण संख्या 288
त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे किमान 29 आमदारांचं संख्याबळ आवश्यक
विरोधी बाकावरच्या महाविकास आघाडीतील पक्षांपैकी
ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20
काँग्रेसकडे 15,
तर पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या