शूटिंगवेळी शाहरुख खान जखमी झाल्याची बातमी व्हायरल, ममता बॅनर्जींच्या पोस्टने वेधलं लक्ष
CM Mamata Banerjee on ShahRukh Khan : अभिनेता शाहरुख खान शूटिंगवेळी जखमी झाल्याची बातमी व्हायरल झाली होती. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

CM Mamata Banerjee on ShahRukh Khan : बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान ( ShahRukh Khan) शनिवारी (दि.19) एका सिनेमाच्या शूटिंगवेळी जखमी झाल्याची बातमी व्हायरल झाली होती. सेटवर जखमी झाल्यानंतर त्याला तातडीने अमेरिकेला हलवण्यात आलंय, असंही सांगण्यात येत होतं. दरम्यान, यावर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर ट्वीट करुन शाहरुखबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, 'किंग' चित्रपटाशी संबंधित एका सूत्राकडून माहिती मिळवली असता त्यांनी या दाव्यांना खोटं ठरवलं आहे. सूत्राने सांगितलं, "कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. हे सगळं खोटं आहे. कसं काय लोक कोणतीही गोष्ट खात्री न करता पसरवतात, हेच कळत नाही." त्यांनी पुढे सांगितलं, "त्या स्टुडिओमध्ये शूटिंग संपून आता एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे. चित्रपटाचं शूटिंग व्यवस्थित पार पडलं होतं. कुणालाही कुठलीही अडचण आली नाही, न कुणाला इजा झाली. आम्ही तिथं 29 मे ते 12 जून दरम्यान शूटिंग केलं आणि त्यानंतर टीम महबूब स्टुडिओत शिफ्ट झाली, जिथे 24 जून हा शूटिंगचा शेवटचा दिवस होता."
ममता बॅनर्जी काय काय म्हणाल्या?
ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत शाहरुखसाठी प्रार्थना करण्याचं सांगितलं आहे. त्यांनी लिहिलं - “माझा भाऊ शाहरुख खान याला शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याची बातमी ऐकून मला खूप त्रास झाला. त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करते.”
शाहरुख खानला ‘भाऊ’ मानतात ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी आणि शाहरुख खान यांच्यात खूप जवळचं नातं आहे. ममता नेहमी शाहरुखला आपला भाऊ म्हणतात. शाहरुखने देखील एकदा खुलासा केला होता की ममता बॅनर्जी दरवर्षी त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी पाठवतात. 2017 मध्ये कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलनंतरही शाहरुखने ममता बॅनर्जी यांना मिठी मारतानाचा एक फोटो शेअर केला होता. त्यात त्यांनी लिहिलं होतं - “KIFF 2017 मध्ये खूप मजा आली आणि भरपूर प्रेम मिळालं. मला माझं कोलकाता खूप आवडतं आणि नेहमीप्रमाणे ममता दीदींचं प्रेमही मिळतं. आपण खूपच प्रिय आहात.”
इतर महत्त्वाच्या बातम्या



















