Chhaya Kadam : 'आज तू हवी होतीस...', कान्समध्ये पोहचलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची आईसाठी भावनिक पोस्ट
Chhaya Kadam : मराठमोळ्या अभिनेत्रीने कान्स फिल्म फेस्टिवला हजेरी लावल्यानंतर आईसाठी एक भावनिक पोस्ट केली आहे. तसेच त्यांनी यावेळी आईची आठवण देखील काढली आहे.
Chhaya Kadam : 'सैराट' फेम अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांनी बॉलीवूड अभिनेत्रींसह कान्स फिल्म फेस्टिवलला (Cannes Film Festival) हजेरी लावली आहे. छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माई भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्याचप्रमाणे त्या मडगाव एक्सप्रेस या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाचा प्रिमियर यंदाच्या कान्स सोहळ्यात होणार आहे. त्यासाठी त्यांना कान्स फिल्म फेस्टिवलचं आमंत्रण आलं होतं. सोहळ्यात पोहचल्यानंतर या अभिनेत्रीने आईसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
पायल कपाडिया 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या सिनेमात छाया कदम यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांचा एअरपोर्टवरील एक फोटो शेअर केला होता. त्याला त्यांनी चलो कान्स असंही कॅप्शन दिलं होतं. त्यांच्या या पोस्टमुळे सिनेसृष्टीतही अभिमानाचं वातावरण पाहायला मिळालं. विशेष म्हणजे कान्सच्या सोहळ्यात या अभिनेत्रीने तिच्या आईची साडी परिधान केली आणि आईची नथ देखील घातली.
आईसाठी लिहिली खास पोस्ट
छाया कदम यांनी त्यांच्या आईची साडी नेसली आणि त्यांची नथ देखील घेतली.त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले. पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टीव्हल पर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे.तरी आई ! आज तू हवी होतीस, हे सगळं पाहण्यासाठी. यावर अनेकांनी कमेंट्स करत छाया कदम यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
छाया कदम यांचे सिनेमे
छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माई भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्याचप्रमाणे त्या मडगाव एक्सप्रेस या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. याशिवाय छाया यांनी मराठी-हिंदीमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. 'सैराट', 'फँड्री', 'सरला एक कोटी', 'न्यूड', 'हंपी' हे चित्रपटही विशेष गाजले.