'गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मोकळा, चित्रपटाची निर्माती आणि अभिनेत्री आलियाला हायकोर्टाकडून दिलासा
'गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या 'द माफिया क्वीन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. त्या पुस्तकातील काही भाग बदनामीकारक असून त्यानं मूळ गगुबांईंची प्रतिष्ठा डागाळली आहे.
मुंबई : 'गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाची निर्माती आणि अभिनेत्री आलिया भटला हायकोर्टानं दिलासा दिला आहे. या सिनेमावर दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या फौजदारी दाव्यावरून दंडाधिकारी न्यायालयानं बजावलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे.
'गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या 'द माफिया क्वीन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. त्या पुस्तकातील काही भाग बदनामीकारक असून त्यानं मूळ गगुबांईंची प्रतिष्ठा डागाळली आहे. त्यामुळे गंगुबाईंच्या मुलभूत अधिकाराचं उल्लंघन केले आहे. असे सांगत गंगुबाई काठियावाडी यांचा दत्तक मुलगा बाबूजी रावजी शहा यांनी मुंबईतील महानगर दंडाधिकाऱ्यांकडे या चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेत्री आलिया भट्टविरोधात मानहानीचा फौजदारी दावा केला आहे. त्याची दखल घेत महानगर दंडाधिकाऱ्यांनी चित्रपट निर्माते आणि अलियाला समन्स जारी केलं होतं. त्याला भन्साळी प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड, संजय लीला भन्साळी आणि आलिया भटनं हायकोर्टात आव्हान दिलेलं होते. त्यावर नुकतीच न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, मुंबई शहर दिवाणी न्यायालयानं 'द माफिया क्वीन ऑफ मुंबई'च्या लेखकांना कादंबरीच्या प्रकाशन, विक्री किंवा पुस्तकावर हक्क निर्माण करण्यापासून कायमस्वरुपी रोखण्यात यावे, अशी मागणी करणारा खटला फेटाळून लावल्याची बाब याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. आबाद पौंडा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत सर्व प्रतिवादींना नोटीस बजावत हायकोर्टानं पुढील सुनावणीपर्यंत कारवाईला स्थगिती देत सुनावणी 7 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.
चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
रावजी शहा यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावरही स्थगिती देण्यात यावी आणि हुसैन जैदी या लेखक/प्रकाशकांना गंगूबाईंच्या जीवनावर इतर कोणतीही कथा लिहिण्यापासून रोखण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी एक स्वतंत्र याचिकाही मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, व्यक्तीच्या मृत्यूसह त्यांच्याविरोधातील कोणतीही बाबही मृत ठरते. तसेच याचिकाकर्त्यांना ते गंगूबाई काठियावाडींचा दत्तक मुलगा आहेत, हे पटवून देण्यास प्रथमदर्शनी अपयशी ठरल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवत शहा यांची मागणी फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आपल्या चित्रपटांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारे प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे हे प्रदर्शन लांबणीवर पडलं.
संबंधित बातम्या :
'गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मोकळा