MC Stan : 80 हजारांचे शूज, दीड कोटींचे दागिने आणि बरचं काही... 'बस्ती का हस्ती' एमसी स्टॅन दिवसाला स्वत:वर खर्च करतो लाखो रुपये
Mc Stan : 'बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅन वेगवेगळ्या कारणांनी सध्या चर्चेत आहे.
Mc Stan : 'बस्ती का हस्ती' अशी ओळख असलेला एमसी स्टॅन (MC Stan) सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) माध्यमातून एमसी स्टॅन घराघरांत पोहोचला आहे. रॅपर एमसी स्टॅन त्याच्या रॅपपेक्षा हटके स्टाइल आणि बोलण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे जास्त चर्चेत आहे.
'बिग बॉस 16'मध्ये एमसी स्टॅनची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. त्याच्या खेळीपेक्षा त्याचे कपडे, शूज आणि दागिन्यांनी चाहत्यांचं जास्त लक्ष वेधलं. 'बिग बॉस 16'च्या प्रीमियरला एमसी स्टॅन 80 हजार रुपयांचा शूज घालून आला होता. त्यानंतर त्याचा '80 हजार के जूते' हा डायलॉग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यावेळी एमसी स्टॅन 80 हजार रुपयांचा शूज घालत असल्याचे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण 80 हजार ही फक्त त्याच्या एका शूजची किंमत आहे.
दिवसाला लाखो रुपये स्वत:वर खर्च करणारा एमसी स्टॅन
एमसी स्टॅन हा लोकप्रिय रॅपर आहे. 'तडीपार' आणि 'इंसान' ही त्याची गाणी सुपरहिट ठरली आहेत. एका मुलाखतीत एमसी स्टॅन म्हणाला,"मी दररोज 1 लाख 20 हजार किंमतीचे शूज घालतो. तर 45 हजार रुपययांचं टी-शर्ट परिधान करतो. तसेच मी घालत असलेले नेकपीस आणि दागिन्यांची किंमत 1.50 कोटींच्या घरात आहे". 'बिग बॉस 16'मध्ये एमसी स्टॅनच्या नेकपीस, कानातले आणि अंगठीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक एमसी स्टॅन (MC Stan Net Worth)
'बिग बॉस 16'मध्ये एमसी स्टॅनने भांडणापेक्षा आपल्या हटके स्टाइलने सर्वांना वेड लावलं होतं. एका कार्यक्रमाचं एमसी स्टॅन 20 ते 25 लाख मानधन घेतो. 23 वर्षीय रॅपरची एकूण संपत्ती 16 कोटींच्या घरात आहे. 'बिग बॉस 16'च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅनला 31 लाख 80 हजार रुपये रक्कम देण्यात आली. तसेच हुंडई ग्रॅन्ड आय 10 निओस ही गाडीदेखील भेट देण्यात आली.
अरजित सिंह, एआर रहमानला एमसी स्टॅनने टाकलं मागे
'बिग बॉस 16' जिंकल्यानंतर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. नुकतच त्याने एक इन्स्टा लाइव्ह केलं असून या लाइव्हला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. जगभरातील टॉप 10 लाइव्हमध्ये या लाइव्हचा समावेश झाला आहे. त्यामुळे त्याने आता अरिजित सिंह, एआर रहमान आणि नेहा कक्कर या गूगल ट्रेंडमध्ये असणाऱ्या सेलिब्रिटींनादेखील मागे टाकलं आहे.
संबंधित बातम्या