(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Actress Death : निवडणुकीच्या प्रचारास निघाली अन् विमान अपघातात अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Soundarya Death : अमिताभ बच्चन यांच्या 'सूर्यवंशम' (Sooryavansham) चित्रपटातील अभिनेत्री सौंदर्या (Soundarya) हिने एकापेक्षाएक चित्रपटात काम केलं आहे. पण वयाच्या 31 व्या वर्षी विमान अपघातात अभिनेत्रीचं निधन झालं होतं.
Soundarya Death : बॉलिवूडचे (Bollywood) अनेक चित्रपट चांगलेच गाजले आहेत. 1999 मध्ये आलेला 'सूर्यवंशम' (Sooryavansham) हा चित्रपट सर्वांनीच पाहिला असेल. छोट्या पडद्यावर अनेकदा हा चित्रपट दाखवला जातो. या सिनेमातील प्रत्येक सीन, डायलॉग प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. या चित्रपटात अभिनेत्री सौंदर्या (Soundarya) झळकली होती. सिनेमात ती हीरा ठाकुरच्या पत्नीच्या भूमिकेत होती. सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये असलेल्या सौंदर्याने कन्नड, तामिळ, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचं मन जिंकलं. कमी वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या सौंदर्याचा अंत मात्र हृदयद्रावक होता. वयाच्या 31 व्या वर्षी अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. विमान अपघातात तिचं निधन झालं होतं.
नागार्जुनसोबत शेअर केली स्क्रीन
सौंदर्याने 1992 मध्ये 'बा न्ना प्रीथिसू' या कन्नड चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. मातृभाषेतून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. अल्पावधीतच तिचा तेलुगू सिनेमांतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये समावेश झाला. सौंदर्याला 1994 मध्ये आलेल्या 'हॅलो ब्रदर' या चित्रपटाच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने नागार्जुन आणि राम्या कृष्णासोबत स्क्रीन शेअर केली होती.
दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवल्यानंतर सौंदर्याने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. 'सूर्यवंशम' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. छोट्या पडद्यावर आजही अनेकदा हा चित्रपट दाखवला जातो. या चित्रपटाचा मोठा चाहतावर्ग आहे. 12 वर्षात 100 चित्रपट देणारी अभिनेत्री सिने-निर्मितीही करत होती. तिच्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.
विमान अपघातात झाला अभिनेत्रीचा मृत्यू
सौंदर्या फक्त चित्रपटच नव्हे तर छोट्या पडद्यावरदेखील धमाकेदार पदार्पण करणार होती. पण बीजेपीसोबतच्या एका करारामुळे तिला छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करता आलं नाही. अभिनेत्रीने 2004 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 17 एप्रिल 2004 रोजी ती पक्षाच्या प्रचारासाठी बंगळुरुहून करीमनगरला जात होती. तिचं विमान 100 फूट उंचीवर गेलं आणि गांधी कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात कोसळलं. या विमान अपघातात अभिनेत्री सौंदर्या आणि तिच्या भावासह आणखी दोन लोकांचा मृत्यू झाला.
सौंदर्याच्या मृत्यूची झालेली भविष्यवाणी
सौंदर्याच्या बालपणी एका ज्योतिषाने तिच्या आकस्मिक मृत्यूची भविष्यवाणी केली होती. सौंदर्याचं लग्न एस. रघुसोबत झालं होतं. तिचा पती व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर होता. तसेच अभिनेत्रीचा बालपणीचा मित्रही होता.
सौंदर्याने अमिताभ बच्चन, रजनीकांत, कमल हासन, ममूटी, मोहनलाल, विष्णुवर्धन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटात काम करण्यासोबत अभिनेत्री सामाजिक कामेदेखील करत असे. सौंदर्याचं खरं नाव सौम्या सत्यनारायण असं होतं. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग होता. तिच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.
संबंधित बातम्या