CM Eknath Shinde Meet Salman Khan : 'गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नाही'; सलमान खानच्या भेटीनंतर CM एकनाथ शिंदेचे आश्वासन
CM Eknath Shinde Meet Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर एकच मोठी खळबळ उडाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खानची त्याच्या राहत्या घरी भेट घेतली
CM Eknath Shinde Meet Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर एकच मोठी खळबळ उडाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अभिनेता सलमान खानची त्याच्या राहत्या घरी भेट घेतली. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनालही उपस्थित होते.
रविवारी, 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भाईजान सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थाना बाहेर गोळीबार झाला. बाईक वरून आलेल्या दोन अज्ञातांनी केलं आणि पळ काढला. लमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानसोबत फोनवरून चर्चा केली होती.
सलमान खानच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले?
मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. या घटनेमागे कोण आहे, त्याची पाळेमुळे खणून काढण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जे या कटात सहभागी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुजरातमधून दोन आरोपी अटकेत
सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळाले. सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गुजरात मधील भूज येथून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आज, मंगळवारी सकाळी दोन्ही आरोपींना मुंबईत आणण्यात आले. कोर्टाने त्यांना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी नवी मुंबईतील पनवेलमध्ये वास्तव्य करत होते. मागील एक महिन्यापासून त्यांनी पनवेलमध्ये भाड्यावर घर घेतले होते. या दोघांनी सलमान खानच्या घराची रेकी केली आणि त्यानंतर गोळीबार केला. दोन्ही आरोपींना सोमवारी रात्री उशिरा भूजमधून मुंबई पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी हे मूळचे बिहार राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील आहे.
सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर काही तासांनंतर अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटवरून जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. हेच खाते चालवणाऱ्या अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीचे नावही आरोपी म्हणून FIR मध्ये नोंदवण्यात आले आहे. अनमोल बिश्नोई हा तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असून तो सध्या परदेशात आहे.