रितेश देशमुखकडून भावुक व्हिडीओ शेअर करुन वडिलांच्या आठवणींना उजाळा
अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची आज 75वी जयंती आहे. यानिमित्ताने रितेशने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. आपल्या चाहत्यांसाठी तो नेहमीच गंमतीशीर व्हिडीओ पोस्ट करत असतो. नेहमीप्रमाणे आजही रितेशने आपल्या चाहत्यांसाठी एक खास टिकटॉक व्हिडीओ पोस्ट केला आहे. परंतु, हा व्हिडीओ थोडा वेगळा आहे. रितेशने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे चाहत्यांना हसवण्याऐवजी इमोशनल केलं आहे. मंगळवारी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने एक व्हिडीओ शेअर करत आपले वडिल म्हणजेच, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आज माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची 75वी जयंती आहे. याच निमित्ताने विलासरावांच्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडीओ रितेशने शेअर केला आहे. ज्यामध्ये तो भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, रितेशला आपल्या वडिलांची फार आठवण येत आहे. त्यांच्या कपड्यांना मिठी मारताना तो भावूक झाला आहे.
रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विलासराव देशमुख यांचे कपडे हँगरवर लावून ठेवले आहेत. रितेश हँगरला अडकवलेल्या विलासरावांच्या शर्टच्या बाहीमध्ये आपला हात टाकतो आणि स्वतःची पाठ थोपटतो. व्हिडीओच्या शेवटी विलासरावांचा एक फोटो आहे. त्यावर लिहिलं आहे, 'हॅपी बर्थडे पापा'. व्हिडीओच्या बॅकग्राउंडला 'अग्निपथ' चित्रपटाचं 'अभी मुझ में कहीं' हे इमोशनल गाणं सुरु आहे.
रितेश देशमुखने शेअर केलेला व्हिडीओ :
रितेशने शेअर केलेला व्हिडीओ पाहून त्याचे फॅन्सही भावूक झाले आहेत. व्हिडीओसोबत रितेश देशमुखने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'हॅपी बर्थडे पापा, मी तुम्हाला दररोज मिस करतो.' तसेच विलासरावांच्या 75व्या जयंतीनिमित्ताने अनेक दिग्गजांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. व्हिडीओ व्यतिरिक्त रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाउंटचा प्रोफाइल फोटोही बदलला आहे. ज्यामध्ये विलासराव देशमुख यांना 75व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
दरम्यान, विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी महाराष्ट्रातील बाभलगाव नावाच्या गावात झाला होता. काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांनी दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचं निधन झालं होतं.