एक्स्प्लोर
रिव्हयू : मी शिवाजी पार्क
सतीश आळेकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, शिवाजी साटम, अशोक सराफ अशा दिग्गजांना एकत्र पाहणं म्हणजे खरंतर सोहळा आहे. आणि मूळात हा एक व्यावसायिक सिनेमा आहे.
व्यवस्था आणि त्यात भरडला जाणारा सामान्य माणूस. त्याची होणारी पिळवणूक, त्याच्यावर होणारा अन्याय आणि अखेर या गळचेपीतून त्या कॉमन मॅनमध्ये संचारलेला सुपरमॅन अशी वनलाईन असलेले अनेक सिनेमे आजवर आले आहेत. 'मी शिवाजी पार्क' काहीसा त्याच वर्गातला.
ज्या कॉमन मॅनला समोर ठेऊन व्यवस्थेची रचना केली गेली तिच व्यवस्था त्यांच्या जिवावर उठली आहे. इथं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर पैसा आहे. पैसा फेका आणि व्यवस्थेला हवं तसं नाचवा. कायदे असतील पण ते फक्त वाकवण्यासाठी. दिवसाढवळ्या खून करुन इथं 'निर्दोष' सुटता येतं. थोडक्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली जो तमाशा सुरु आहे तो चीड येण्यापलीकडचा आहे.
यातूनच 'मी शिवाजी पार्क' हा सिनेमा आकार घेतो. पार्कात भेटणाऱ्या सेवानिवृत्त मित्रांची ही गोष्ट. त्यातल्या एकाच्या नातीचा खून होतो आणि तो खून गर्भश्रीमंत बिल्डरने केलेला असतो. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे पैसे हे प्रत्येक गोष्टीचं उत्तरं असल्यानं तो बिल्डर त्या जीवावर साऱ्या गोष्टी मॅनेज करु पाहातो. 'त्या' न्यायालयात न्याय मिळत नाही म्हटल्यावर ते मित्र स्वतंत्र न्यायालयात 'निकाल' लावायचं ठरवतात. त्याच निकालाची गोष्ट म्हणजे 'मी शिवाजी पार्क'
सतीश आळेकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, शिवाजी साटम, अशोक सराफ अशा दिग्गजांना एकत्र पाहणं म्हणजे खरंतर सोहळा आहे. आणि मूळात हा एक व्यावसायिक सिनेमा आहे. त्यामुळे दोन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद या सिनेमात आहे.
पूर्वार्ध आणि उत्तरार्धात आपल्याला दोन गोष्टी पाहायला मिळतात. दोन गोष्टींपेक्षा दोन घटना म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. हा बदलणारा ट्रॅक थोडासा गोंधळ निर्माण करतो कारण आपल्यासाठी पहिली घटना हिच मुख्य स्टोरीलाईन झालेली असते. पण नंतर त्यांना एकत्र सांधण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत.
सिनेमातली सगळीच कलाकार मंडळी, त्यांनी अगदी सहजतेने केलेलं काम आणि खिळवून ठेवणारी गोष्ट हे या सिनेमाचे प्लस पॉईंट्स.
या सगळ्यात काही खटकणाऱ्या गोष्टीही आहेत. मिशन यशस्वी करण्यासाठी मित्रांनी आखलेला प्लॅन खूपच वरवरचा वाटतो. दिगंबर सावंत बलवाला तुझ्याविरोधात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचं सांगतो. पण जेव्हा दिगंबर सावंत आणि टीमचा शोध सुरु होतो तेव्हा पोलीस कुठेही सीसीटीव्ही फुटेज चेक करताना दिसत नाहीत. किंवा त्यांच्या बोलण्यात त्याचा उल्लेखही येत नाही. खुनाच्या केसमध्ये मृत तरुणी गर्भवती असताना पोलिसांना डीएनए चाचणीचा आधार घ्यावासा वाटत नाही. गुन्हेगार शोधण्यासाठी पोलीस ठराविक साचेबद्ध पद्धत वापरत नाहीत हे जरी मान्य केलं तरी सीसीटीव्ही आणि डीएनए या दोन बेसिक गोष्टींपासून पोलिसांच्या तपासाला सुरुवात होते असं मला वाटतं. आणि सगळ्यात जास्त खटकणारी गोष्ट म्हणजे यातलं शेवटी येणारं एक गाणं. ते गाणं सुरु होऊन संपेपर्यंत याची काय गरज होती असं सतत वाटत राहतं.
अशा काही गोष्टी वगळता 'मी शिवाजी पार्क' हा सिनेमा 'नक्की पाहा' या वर्गातला आहे.
सिनेमाच्या शेवटी थिएटरमधून बाहेर पडताना आपण काय घेऊन जातो तर पुन्हा 'प्रश्नचिन्ह'च. न्यायासाठी सत्याग्रह की बंदूक याचं उत्तर मिळालंय असं वाटत असतानाच क्लायमॅक्सचा सीन आपण जिथून सुरुवात केली तिथेच परत घेऊन जातो.
शेवटी हा सिनेमा जे प्रश्न उपस्थित करतो त्याची उत्तरं आजच्या घडीला तरी कोणाकडेच नाहीत. त्यात महेश मांजरेकरांचा काय दोष?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement