Ravrambha : 'रावरंभा'...मावळ्याच्या प्रेमाची आणि शौर्याची गाथा; राव आणि रंभाची ऐतिहासिक प्रेमकथा आज घरबसल्या पाहा
Ravrambha : 'रावरंभा' हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांना आज घरबसल्या पाहता येणार आहे.
Ravrambha Marathi Movie : 'रावरंभा' (Ravrambha) हा मराठी सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा यशस्वी झाला. आता हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. 'रावरंभा' या सिनेमात प्रेक्षकांना राव आणि रंभाची ऐतिहासिक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे.
'रावरंभा' घरबसल्या पाहा...
'रावरंभा' हा सिनेमा प्रेक्षकांना घर बसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘झी टॉकीज’ वाहिनीवर रविवार म्हणजे 15 ऑक्टोबरला सिनेमाचा प्रीमियर होणार आहे. दुपारी 12 आणि सायंकाळी 6 वाजता प्रेक्षकांना ‘रावरंभा’ हा ऐतिहासिक सिनेमा पाहायला मिळणार आहे.
राव आणि रंभाची ऐतिहासिक प्रेमकथा छोट्या पडद्यावर
हिंदवी स्वराज्य उभे करताना छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची. ज्यांना फक्त एकच गोष्ट ठाऊक होती ती म्हणजे आपण ‘फकस्त लढायचं, आपल्या राजासाठी अन स्वराज्यासाठी’. इतिहास नेहमीच शौर्याने, पराक्रमाने, तर कधी कधी अनेक षडयंत्रांनी भरलेला असतो. ऐतिहासिक काळातील महान व्यक्तिरेखांवर बेतलेले सिनेमे अलीकडच्या काळात आले आणि त्याला उदंड लोकाश्रयही मिळाला. याच यादीत एका चित्रपटाचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे.
View this post on Instagram
'रावरंभा' हा इतिहासाचा काहीसा दुर्लक्षित ‘प्रेम अध्याय’ प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली रोमांचकारी प्रेमकथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये अनेक प्रेमकथा गाजल्या. त्यांनी प्रेमासाठी केलेला त्याग, संघर्ष आपल्याला भावतो, अशा शौर्यवान, बुद्धिमान, पराक्रमी.. थोडक्यात हिमालयाएवढ्या व्यक्तिमत्वामागे उभ्या राहणाऱ्या स्त्रीलाही हिमालयाची सावलीच बनावं लागतं हे दाखवून देणारा हा सिनेमा आहे.
'रावरंभा' यांची प्रेमकथा अतिशय सुंदररीत्या चित्रपटात गुंफण्यात आली आहे. काही मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं आहे. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रती आणि स्वराज्याच्या प्रती असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या कथेला असल्याचे दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात.
आधी स्वराज्य मग आपला संसार : रावजी
'रावरंभा' यांचं नुकतंच फुलत आलेलं प्रेम, त्यातच स्वराज्यावर चालून आलेलं संकट ‘राव’ कसा परतवून लावतो? हे दाखवताना ‘आधी स्वराज्य मग आपला संसार’ हे ब्रीद मानणाऱ्या रावजीला आपल्या प्रेमासाठी कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागतं याची चित्तथरारक आणि रोमहर्षक कथा ‘रावरंभा’ चित्रपटातून उलगडणार आहे. ‘मुळशी पॅटर्न’मधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता ओम भूतकर आणि सौंदर्यासोबत अभिनयाचा सुरेख मिलाफ असलेली गुणी अभिनेत्री मोनालिसा बागल या चित्रपटातून जोडीच्या रूपाने समोर येणार आहेत.
संबंधित बातम्या